मुंबई, 31 डिसेंबर : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे (30 डिसेंबर) अपघात झाला. ऋषभ दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. रुरकीतील नरसन सीमेजवळ त्याची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. जेव्हा त्याची गाडी अपघातग्रस्त झाली तेव्हाच तेथून जात असलेल्या हरियाणा रोडवेजच्या बसचे चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजित यांनी पंतला कारमधून बाहेर पडण्यास आणि त्याला वेळेवर रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, माजी क्रिकेटपटू आणि खासदार हरभजनसिंग आणि माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांनी बस ड्रायव्हर आणि कंडक्टरचे आभार मानले आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सुशील कुमार आणि परमजित यांच्या फोटोंसह दोन ट्विट केली आहेत. ‘जनसत्ता’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय म्हणाला लक्ष्मण? ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा त्याच्या गाडीनं पेट घेतला होता. त्यानंतर गाडीच्या काचा तोडून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी हरियाणा रोडवेजच्या बसचे चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजित यांनी त्याची मदत केली. त्यांच्यामुळे पंतचा जीव वाचला म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दोघांचे जाहीर आभार मानले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मणनं लिहिलंय, “हरियाणा रोडवेज ड्रायव्हर सुशील कुमार यांचे आभार. त्यांनी ऋषभ पंतला जळत्या कारमधून बाहेर काढलं. त्याला बेडशीटमध्ये गुंडाळलं आणि रुग्णवाहिका बोलावली. सुशीलजी तुमच्या निस्वार्थ सेवेसाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत. सुशील कुमार खरे हिरो आहेत.”
व्हीव्हीएस लक्ष्मणनं आणखी एक ट्विट करून बस कंडक्टर यांचेही आभार मानले आहेत. “मी बस कंडक्टर परमजित यांचा विशेष उल्लेख करू इच्छितो. ड्रायव्हर सुशीलसोबत परमजित यांनी ऋषभला मदत केली. प्रसंगावधान राखत आणि मनाचा मोठेपणा दाखवून एका व्यक्तीचा जीव वाचवणाऱ्या या निस्वार्थी लोकांचे मनापासून आभार. या दोघांव्यतिरिक्त इतर ज्यांनी मदत केली त्यांचेही आभार,” असं ट्विट लक्ष्मणनं केलं आहे. ऋषभ पंतवर दिल्लीत होणार उपचार? गरज पडल्यास एअर लिफ्ट करण्याची तयारी माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांनीही ड्रायव्हर सुशील कुमारला ‘रिअल हिरो’ म्हटलं आहे. याशिवाय, आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य आणि माजी स्पिनर हरभजनसिंग यांनीही व्हीव्हीएस लक्ष्मणची ट्विट रिट्विट केली आहेत. हरभजननं लिहिलं आहे, “सुशील कुमार जी तुमचे खूप खूप आभार.” हरभजननंदेखील सुशील कुमारला हिरो म्हटलं आहे. बस ड्रायव्हर आणि कंडक्टरचा होणार सन्मान बस चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजित यांचा पानिपत बस डेपोचे जीएम कुलदीप जांगरा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मानवतेचं उत्कृष्ट उदाहरण निर्माण केल्याबद्दल हरियाणा राज्य सरकारदेखील या दोघांचा सन्मान करणार आहे.