मुंबई, 24 एप्रिल : भारतीय क्रिकेट टीम (Team India) आयपीएलच्या 15 व्या सिझननंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका विरूद्ध सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयनं शनिवारी या टी20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. या मालिकेची सुरूवात 9 जून रोजी दिल्लीमध्ये होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका असेल. आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनची फायनल 29 मे रोजी होणार आहे. तर 5 सामन्यांच्या मालिकेची सुरूवात 9 जून रोजी नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअममध्ये होणार आहे. त्यानंतर कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बेंगळुरू इथं या मालिकेतील सामने होतील. ऑस्ट्रेलियात यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम सेमी फायनलमध्येही पोहचू शकली नव्हती. त्या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचा कॅप्टन झाला. या सीरिजमध्येही तोच कॅप्टन असण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचा फॉर्म आयपीएल स्पर्धेत हरपला आहे. तसंच त्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळणारी मुंबई इंडियन्सची टीम पहिल्या सात सामन्यांमध्ये पराभूत झाली आहे. पण, टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून रोहितचा भक्कम रेकॉर्ड आहे. पूर्णवेळ कॅप्टन झाल्यापासून रोहितने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका विरूद्धची टी20 मालिका जिंकली आहे. आगामी टी20 वर्ल्ड कपच्या तयारीचा भाग म्हणून या मालिकेत हार्दिक पांड्या, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे. IPL 2022 : मुंबई इंडियन्समध्ये ऑल इज नॉट वेल? खेळाडूने डिलीट केलं ते ट्वीट भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिकेचं वेळापत्रक पहिली टी20 - नवी दिल्ली - 9 जून दुसरी टी20 - कटक - 12 जून तिसरी टी20 - विशाखापट्टणम - 14 जून चौथी टी20 - राजकोट - 17 जून पाचवी टी20 - बेंगलुरू - 19 जून