मुंबई, 24 एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Rajasthan Royals vs Delhi Capitals) यांच्यातील नो बॉल वादाचा फटका कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant), सहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे (Pravin Amre) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना बसला आहे. पंत आणि शार्दुलवर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. तर आमरे यांच्यावर एका मॅचची बंदी घालण्यात आलीय. हा वाद सुरू असताना आमरे यांनी मैदानात धाव घेत अंपायर्सशी वाद घातला होता. आता या प्रकरणात एक नवी माहिती समोर आलीय. या माहितीनुसार आमरे मैदानात जाण्यास तयार नव्हते. त्यांनी कॅप्टन पंतला शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही पंतनं त्यांचं ऐकलं नाही. त्यानंतर आमरे यांना मैदानात जावं लागलं. दिल्ली कॅपिटल्सच्या संबंधित सुत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘सर तुम्ही मैदानात जाता की मी जाऊन अंपायरशी बोलू?’ असा प्रश्न पंतनं आमरे यांना विचारला होता. त्यावेळी कॅप्टननं मैदानात जाणं योग्य नाही असं आमरेंना वाटले. त्यामुळे त्यांनी मैदानात प्रवेश केला. आमरेंच्या जागी पंत मैदानात गेला असता तर कदाचित त्याच्यावर एका मॅचची बंदी लागली असती. त्यामुळे पंतला वाचवण्यासाठी आमरे यांनी जाणीवपूर्वक ही कृती करत स्वत:वर बंदी ओढावून घेतल्याचं मानलं जात आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.या सर्व प्रकाराबद्दल पंतचे राजस्थान विरूद्धच्या मॅचचे शंभर टक्के मानधन कापण्यात येणार आहे. पंतला साथ देत हात वर करणाऱ्या शार्दुल ठाकूरचे 50 टक्के मानधन कापण्यात येणार असून आमरेंवर मॅच फिसची शंभर टक्के रक्कम आणि एका मॅचची बंदी घालण्यात आली आहे. IPL 2022 : SRH ची पॉईंट टेबलमध्ये मोठी उडी, नामुश्कीदायक पराभवानंतर RCB अडचणीत ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण आमरे यांनी त्यांच्यावरील आरोप मान्य केले असून शिक्षा स्विकारली आहे. या सर्व प्रकरणात मॅचनंतर बोलतानाही पंतनं त्याची चूक मान्य केली होती. ‘तो नो बॉल आमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला असता. डग आऊटमध्ये आम्ही सर्व निराश झालो होतो. तो नो बॉल असल्याचं सर्वांनी पाहिलं. माझ्या मते थर्ड अंपायरनं हस्तक्षेप करत नो बॉल द्यायला हवा होता. प्रविण आम्रे यांना मैदानात पाठवणे चूक होते, हे मला माहितीय. पण, आमच्याबाबतीत जे घडलं ते चूक होतं.’ असं पंत म्हणाला.