मुंबई, 9 एप्रिल : देशांतर्गत क्रिकेटमधील ऑल राऊंडर असलेल्या राहुल तेवातियाचे (Rahul Tewatia) नाव 2020 पर्यंत फार कुणाला माहिती नव्हते. त्यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये तेवातियानं राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सुरूवातीच्या संथ खेळीनंतर एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स लगावले होते. पंजाब किंग्जचा (Punjab Kings) फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेलच्या एकाच ओव्हरमध्ये त्यानं 5 सिक्स लगावत राजस्थानला मोठं टार्गेट यशस्वीपणे पूर्ण करून दिलं. आता दोन वर्षांनी आयपीएल 2022 मध्ये तेवातिया राजस्थानकडून नाही तर गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) खेळतोय. त्यानं पुन्हा एकदा पंजाब किंग्जच्या बॉलरची निर्णायक क्षणी धुलाई करत टीमला सनसनाटी विजय मिळवून दिला आहे.पंजाब किंग्सने दिलेल्या 190 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून शुभमन गिलने 59 बॉलमध्ये 96 रनची खेळी केली. तर कॅप्टन हार्दिक पांड्यानं 18 बॉलमध्ये 27 रन केले. हे दोघं आऊट झाल्यानंतर गुजरातचा विजय अवघड बनला होता. राहुल तेवातिया शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला. त्यावेळी मॅच पंजाबच्या बाजूनं झुकली होती. शेवटच्या 2 बॉलवर 12 रनचं अवघड आव्हान त्याच्यासमोर होतं. तेवातियानं ओडियन स्मिथला 2 सिक्स मारत गुजरातला विजय मिळवून दिला. आयपीएलच्या या मोसमात गुजरातने अजूनपर्यंत एकही मॅच गमावलेली नाही. 3 सामन्यांमध्ये त्यांच्या खात्यात 3 विजय आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. IPL 2022 : 4 बॉलमध्ये 4 विकेट घेणाऱ्याचं पदार्पण, विदर्भ एक्सप्रेस पहिल्याच सामन्यात सुस्साट! धोनीची बरोबरी गुजरात टायटन्सनं यंदा 9 कोटींमध्ये तेवातियाला खरेदी केले आहे. फ्रँचायझीचा हा विश्वास त्यानं पंजाब विरूद्धच्या मॅचमध्ये सार्थ ठरवला. यापूर्वी फक्त महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) केलेल्या रेकॉर्डची बरोबरी तेवातियानं केली आहे. धोनीनं आयपीएल 2016 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना शेवटच्या दोन बॉलवर 12 रन हवे होते त्यावेळी 2 सिक्स मारत टीमला विजय मिळवून दिला होता. धोनीनं अक्षर पटेलच्या बॉलिंगवर हे सिक्स लगावले होते. विशेष म्हणजे त्यावेळी अक्षर पटेलही पंजाब किंग्जकडून खेळत होता.