फोटो - IPL
मुंबई, 1 मे : रोहित शर्माचा वाढदिवस (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सनं शनिवारी रात्री खऱ्या अर्थानं साजरा केला. मुंबईनं राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. सलग आठ पराभवानंतर मुंबईला रोहितच्या वाढदिवशी या सिझनमधील पहिलं यश मिळालं. राजस्थाननं विजयासाठी दिलेलं 159 रनचं आव्हान मुंबईनं 19.2 ओव्हरमध्ये पूर्ण करत टीमच्या विजयाची प्रतीक्षा अखेर संपवली. मुंबई इंडियन्सनं गेल्या 6 मॅचमध्ये ज्याला टीमच्या बाहेर बसवलं त्याच टीम डेव्हिडमुळे (Tim David) हा पहिला विजय मिळाला आहे. मुंबईच्या पहिल्या दोन विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी मुंबईचा डाव सावरला. सूर्याने 39 बॉलमध्ये 51 आणि तिलकने 35 रन केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा एकत्रच आऊट झाल्यानंतर मुंबईचं टेन्शन पुन्हा वाढलं होतं, पण टीम डेव्हिडने राजस्थानच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. 9 बॉलमध्ये 20 रनवर डेव्हिड नाबाद राहिला. त्यानं शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीमुळेच मुंबईला हा विजय मिळाला आहे. जगभरातील टी20 लीगचा अनुभव असलेल्या टीम डेव्हिडला मुंबई इंडियन्सनं या आयपीएल लिलावात 9 कोटी 25 लाखांना खरेदी केले होते. इतकी मोठी रक्कम देऊनही डेव्हिड मागील 6 मॅच बेंचवरच होता. मुंबई इंडियन्सच्या पहिल्या दोन पराभवानंतर त्याला टीममधून वगळण्यात आले होते. मुंबईच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत डेव्हिडचा पुन्हा एकदा टीममध्ये समावेश करण्याची मागणी केली होती. मुंबईनं अखेर शनिवारी राजस्थान विरूद्ध डेव्हिडचा टीममध्ये समावेश केला. त्यानं टीमला विजय मिळवून दिला आहे. IPL 2022 : 3 कारणांमुळे जडेजाच्या जागी धोनी पुन्हा झाला CSK चा कॅप्टन या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईनं राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 6 आऊट 158 रनवर रोखलं. जॉस बटलरची बॅट पुन्हा एकदा मुंबईविरुद्ध तळपली. याआधी मुंबईविरुद्ध शतक करणाऱ्या बटलरने यंदा अर्धशतकी खेळी केली. 52 बॉलमध्ये 67 रनची खेळी करून बटलर आऊट झाला, त्याच्या या खेळीमध्ये 4 सिक्सचा समावेश होता.