मुंबई, 7 मार्च : टीम इंडियानं मोहाली टेस्टमध्ये श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) 1 इनिंग आणि 222 रननं पराभव केला आहे. रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) ऑल राऊंड कामगिरीमुळे भारतीय टीमनं ही मॅच तिसऱ्याच दिवशी जिंकली. जडेजानं सुरूवातीला नाबाद 175 रनची खेळी केली. त्यानंतर 9 विकेट्सही घेतल्या. या ऑल राऊंड कामगिरीमुळे तो मोहालीचा टेस्टचा ‘किंग’ ठरला आहे. मोहाली टेस्टमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या जडेजाचं टीम इंडियानं हॉटेलमध्ये जोरदार स्वागत केलं. भारतीय टीम मोहालीतील हॉटेलमध्ये परतली, त्यावेळी जडेजाच्या स्वागतासाठी खास केक ठेवण्यात आला होता. जडेजानं केक कापला त्यावेळी संपूर्ण टीम तसंच कोचिंग स्टाफ तिथं उपस्थित होता. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात जडेजाचं स्वागत केलं. बीसीसीआयनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जडेजानं जिंकलं मन बॅटिंगमध्ये जडेजा द्विशतकाजवळ होता, पण तरीही रोहित शर्माने (Rohit Sharma) इनिंग घोषित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीका करण्यात येत होती. आता रवींद्र जडेजाने दिलेल्या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘ड्रेसिंग रूममधून मेसेज येत होता आणि मीदेखील त्यांना इनिंग घोषित करण्याविषयी सांगत होतो, कारण बॉल स्पिन व्हायला लागला होता. इनिंग घोषित करून आपण श्रीलंकेला अडचणीत आणू शकतो, असं मी टीमला सांगितलं,’ असं जडेजा म्हणाला. IND vs SL : टीम इंडियाची शक्ती होणार दुप्पट, डे-नाईट टेस्टमध्ये मॅच विनरची एन्ट्री! मॅच संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेही याला दुजोरा दिला. पहिली इनिंग घोषित करताना जडेजालाही विश्वासात घेण्यात आलं होतं, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली आहे. जडेजानं टीम हिताचा विचार करत भारतीय फॅन्सचं मन जिंकलं आहे.