भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात मैदानात तळपणारा 'सूर्या' आजारी होता. (फोटो - BCCI)
मुंबई, 27 सप्टेंबर : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट टी-20 सीरिजमधील शेवटची व निर्णायक मॅच रविवारी, 25 सप्टेंबर 2022 रोजी हैदराबादमध्ये झाली. या मॅचमध्ये टीम इंडियाने 6 विकेटनी विजय मिळवला. त्याचबरोबर टीम इंडियानं सीरिजही 2-1 ने जिंकली. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 4 विकेट गमावून व एक बॉल शिल्लक ठेऊन हे लक्ष्य गाठलं. भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीचा मोठा वाटा होता. मात्र तुम्हाला माहिती आहे का, या मॅचपूर्वी सूर्यकुमार यादव तापाने आजारी होता आणि इंजेक्शन घेऊनच तो मैदानात खेळण्यासाठी उतरला होता. ‘आज तक’ ने याबाबत वृत्त दिलंय. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 सीरिज 2-1 ने जिंकली आहे. रविवारी हैदराबादमध्ये या सीरिजमधील शेवटची मॅच झाली. यात स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवने अप्रतिम खेळी केली. सूर्या मैदानात येताच ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सवर तुटून पडला; पण सूर्यासाठी ही खेळी सोपी नव्हती, कारण तो मॅचपूर्वी आजारी होता. बीसीसीआयने मॅचनंतर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांचा इंटरव्ह्यू पोस्ट केलाय. यामध्ये सूर्यकुमारने मॅचपूर्वी त्याची प्रकृती कशी खराब होती, हे सांगितलंय. इंजेक्शन घेतल्यानंतर तो मॅच खेळण्यासाठी मैदानात आला, असंही तो म्हणताना या व्हिडिओत दिसतंय. सूर्यकुमारने नेमकं काय सांगितलं? अक्षर पटेलने इंटरव्ह्यू दरम्यान सूर्यकुमारला विचारलं की, ‘सकाळी उठल्यावर फिजिओ रूममध्ये खूप धावपळ सुरू होती, आणि सगळे तुझ्याबद्दल बोलत होते. नेमकं काय झालं होतं?’ यावर सूर्यकुमारने सांगितलं की, ‘हवामानातील बदलामुळे आणि सतत प्रवास करत असल्याने माझ्या पोटात दुखू लागलं, आणि नंतर तापही आला. पण ही मॅच निर्णायक होती. त्यामुळे मी डॉक्टरांना सांगितलं की जर वर्ल्ड कप फायनल असती तर मी आजारी म्हणून टीमच्या बाहेर बसू शकलो नसतो. त्याप्रमाणे ही मॅचही महत्त्वाची आहे त्यामुळे मला कोणतीही गोळी किंवा इंजेक्शन द्या, पण मला बरं करा. खेळण्यासाठी जेव्हा मैदानात आलो, तेव्हा तर सर्व नॉर्मल झालं,’ असंही सूर्या म्हणाला.
मॅच विनर गेल्या एका वर्षात सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वांत मोठा मॅच विनर खेळाडू ठरलाय. यामुळेच टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. सूर्याने आतापर्यंत 31 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या असून, त्यामध्ये 926 धावा केल्या आहेत. त्यात, 7 फिप्टी आणि 1 सेंच्युरी आहे. केरळच्या रस्त्यांवर हजारोंची गर्दी, पाहा फॅन्सनी कसं केलं टीम इंडियाचं वेलकम? रविवारी, 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्येही सूर्या मॅच विनर ठरला. भारताला केएल राहुल आणि रोहित शर्मा यांची विकेट गेल्याने सुरुवातीलाच झटका बसला होता. मात्र नंतर सूर्याने विराट कोहलीसोबत अप्रतिम भागीदारी करीत मॅच भारताकडे वळवली. या मॅचमध्ये सूर्याने 36 बॉलमध्ये 69 रन केले. दरम्यान, आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरिज आणि टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा 2022 साठी सूर्याला भारतीय टीममध्ये निवडले आहे. अशात त्याने फिट राहणं संघासाठी गरजेचं आहे.