मुंबई, 5 जून : ऑस्ट्रेलियामध्ये यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपची तयारी (T20 World Cup 2022) टीम इंडियानं सुरू केली आहे. आगामी वर्ल्ड कप लक्षात घेऊन भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी20 मालिकेसाठी खेळाडूंची निवड निवड समितीनं केली आहे. आयपीएल स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंचा या मालिकेसाठी भारतीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाला सध्या महेंद्रसिंह धोनीसारखा (MS Dhoni) फिनिशर क्रिकेटपटची गरज आहे, असं मत माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी व्यक्त केलं आहे. शास्त्रींच्या मते दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) धोनीची जागी अगदी योग्य आहे. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकनं आरसीबीकडून फिनिशरची उत्तम भूमिका पार पाडली आहे. त्यानं या सिझनमध्ये 183 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं रन काढले. या कामगिरीच्या जोरावर मोठ्या कालावधीनंतर त्याचं टी20 टीममध्ये पुनरागमन झालं आहे. रवी शास्त्री यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, ‘ही दिनेश कार्तिकसाठी संधी आहे. तो टीमसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. तो अनुभवी आहे. त्याचा अनुभव टीमसाठी उपयुक्त ठरेल हे आपल्या सर्वांना माहिती आहे. भारतीय टीमला काय हवंय हे आपण पाहिलं पाहिजे. सध्या टीमला टॉप ऑर्डरमध्ये किंवा फिनिशर म्हणून खेळू शकणाऱ्या विकेट किपरची गरज आहे. मला दुसरा पर्याय योग्य वाटतो. आपल्याला महेंद्रसिंह धोनीची भूमिका बजावू शकेल असा विकेट किपर हवा आहे. टीम इंडियाकडं ऋषभ पंत आहे. जो टी20 क्रिकेटमध्ये टॉप 4 किंवा टॉप 5 मध्ये बॅटींग करू शकतो. त्यानंतरही एका फिनिशरची सध्या गरज आहे, कारण, टीममध्ये फारसे फिनिशर नाहीत. महेंद्रसिंह धोनीनं निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता दिनेश कार्तिकला चांगली संधी आहे,’ असं मत शास्त्रींनी व्यक्त केलं. कोरोनामुळे बदललं ‘या’ खेळाडूचं नशीब, सचिन-लाराला जमलं नाही ते 10 व्या टेस्टमध्येच करून दाखवलं दिनेश कार्तिकनं या आयपीएल सिझनमध्ये 16 सामन्यांत 330 रन केले आहेत. आगामी दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेत कॅप्टन केएल राहुल आणि कोच राहुल द्रविड त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी देणार का? हे पाहावं लागेल.