मुंबई, 25 मार्च : प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते आयपीएल 2022 (IPL 2022) बाबत ‘स्पोर्ट्सवॉक’वर इन्स्टाग्राम लाईव्ह करत आहे. त्यावेळी एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांचा फोन खाली पडतो आणि ते कॅमेऱ्यापासून दूर जातात. त्यावेळी व्हिडीओ देखील नीट दिसत नाही. हर्षा भोगले यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फॅन्समध्ये काळजीचं वातावरण होते. फोन खाली पडल्यानंतर व्हिडीओ स्पष्ट दिसत नाही. मात्र हर्षा भोगले यांचा आवाज ऐकू येत आहे. ते गोंधळात असल्याचं दिसत आहे. कोण आलंय, कोण आता तुम्ही? कुठून आला आहात?’ असे प्रश्न ऐकू आले. यानंतर व्हिडीओमध्ये मागून आरडाओरडा ऐकू आला. हे सर्व पाहून मुलाखत घेणाराही घाबरून गेला. त्यालाही नेमकं काय घडलं हे कळाल नाही. सुरुवातील त्याला वाटतं की, हर्षा यांचा फोन खाली पडला. मात्र नंतर आरडाओरडा ऐकून त्याला भीती वाटते. यानंतर स्पोर्ट्सवॉकचा हा व्हिडीओ संपतो.
हा व्हिडीओ वेगानं व्हायरल झाल्यानंतर हर्षा यांनी स्वत: त्यावर ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी ठीक आहे. माझ्यामुळे तुम्हाला टेन्शन आलं त्याबद्दल माफ करा. माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि माझी काळजी करण्यासाठी सर्वांचे आभार. हा व्हिडीओ इतका व्हायरल होईल हे मला वाटलं नव्हतं. ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. याचा हेतू वेगळा होता. माफ करा, आनंदी राहा.
हर्षा भोगले यांच्या पत्नी अनिता भोगले यांनीही त्यानंतर ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. अनिता यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, ‘हर्षा भोगले हे व्यवस्थित आहेत, हे मी जाहीर करत आहे. तो एक प्रोमो होता, जो व्हायरल झाला. तुमच्या प्रेमासाठी आणि काळजीसाठी धन्यवाद.’
हर्षा भोगले आयपीएल 2022 मध्ये कॉमेंट्री करणार आहेत. त्यांचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर काळजी व्यक्त केली जात होती. या प्रकारचा प्रँक करू नये, असं मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले. क्रिकेट विश्वात दिसू लागला Dhoni Effect, आणखी एका दिग्गज कॅप्टन पद सोडणार! आयपीएल 2022 स्पर्धेला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) या लढतीनं यंदाचा सिझन सुरू होत आहे.