मुंबई, 8 मे : क्रिकेट जगतात युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) यावेळी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) 2022 मध्ये खेळत नाहीये. वास्तविक, त्याने या हंगामातून आपलं नाव मागं घेतलं होतं. ख्रिस गेल आयपीएलमध्ये खेळत नसल्याचे पाहून चाहते खूपच निराश झाले आहेत. याबाबत अनेक प्रकारचे अंदाजही बांधले जात होते. मात्र, आता खुद्द ख्रिस गेलनेच या गुपितावरून पडदा काढला आहे. यात ख्रिस गेलने धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या काही मोसमात त्याला हवा तसा सन्मान मिळाला नाही, असे गेलने म्हटले आहे. मात्र, पुढील हंगामात खेळण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली आहे. पंजाबचे प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवणंही कठीण ख्रिस गेल आतापर्यंत आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) नंतर पंजाब किंग्ज (PBKS) कडून क्रिकेट खेळला आहे. 2019 चा हंगाम त्याच्यासाठी चांगला होता. सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो सहाव्या क्रमांकावर होता. मात्र, 2020 आणि 2021 मध्ये पंजाब संघाकडून खेळताना त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवणेही कठीण झाले होते. गेल्या हंगामात गेलने 10 सामने खेळले, ज्यात त्याने 125.32 च्या स्ट्राइक रेटने 193 धावा केल्या, तर 2020 मध्ये त्याने फक्त 7 सामने खेळले आणि 288 धावा केल्या. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 142 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 4,965 धावा केल्या आहेत. 2013 मध्ये त्याने पुणे वॉरियर्सविरुद्ध केलेल्या आयपीएलमधील एका डावात सर्वाधिक धावा (175 धावा) करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ‘या’ अनकॅप्ड गोलंदाजावर फिदा! म्हणाला हा तर भारतीय संघाचं भविष्य ‘मला चांगली वागणूक मिळाली नाही’ ख्रिस गेलने इंग्लिश मीडिया मिररला सांगितले की, ‘गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये मला चांगली वागणूक मिळत नसल्याचं माझ्या जाणवलं. मला वाटलं की या खेळासाठी आणि आयपीएलमध्ये इतकं काम करूनही जर तुम्हाला योग्य तो सन्मान मिळत नसेल तर काय उपयोग? त्यामुळे मेगा लिलावात माझं नाव समाविष्ट केलं नाही. आयपीएलमध्ये न खेळण्याचं हे ऐकमेव कारण आहे. क्रिकेटनंतरही जीवन आहे आणि मी त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आयपीएलमध्ये खेळण्याबाबत गेल म्हणाला, ‘पुढच्या वर्षी मी पुनरागमन करेन. त्यांना माझी गरज आहे. आयपीएलमध्ये मी केकेआर, आरसीबी आणि पंजाब या तीन संघांसाठी क्रिकेट खेळलो आहे. आरसीबी आणि पंजाब यांच्यापैकी एका संघात राहून जेतेपद पटकावायला मला आवडेल. मी आरसीबीमध्ये चांगली कामगिरी केली असून पंजाबकडूनही चांगला खेळलो आहे.