भारत वि. झिम्बाब्वे दुसरी वन डे
हरारे, 21 ऑगस्ट**:** भारत आणि झिम्बाब्वे संघात सध्या तीन सामन्यांची वन डे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघानं झिम्बाब्वेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रविवारी या मालिकेतला दुसरा सामना पार पडला. त्यात भारतीय संघानं झिम्बाब्वेला 5 विकेट्सनी मात दिली. पण याच सामन्यात टीम इंडियाचा खेळाडू सुदैवानं दुखापतीपासून थोडक्यात बचावला. त्याचं झालं असं की टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुलनं सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली. आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या 28व्या षटकात दीपक हुडाकडे कर्णधारानं चेंडू सोपवला. तेव्हा स्ट्राईकवर असलेल्या सीन विल्यम्सनं चेंडू डीप कव्हरमध्ये फटकावला. ईशान किशननं तो अडवला. पण त्यानंतर त्याच्या एका चुकीमुळे भारतीय संघाला मोठा फटका बसू शकला असता. कारण ईशाननं चेंडू अडवला पण थ्रो करताना तो चुकला. आणि त्याचा थ्रो विकेट कीपरऐवजी शॉर्ट मिडऑफवर असलेल्या अक्षर पटेलच्या दिशेनं गेला. अक्षरने तो कसाबसा चुकवला अन्यथा तो थेट त्याच्या डोक्यावर लागला असता. ही घटना टेलिव्हिजन कॅमेरॅत कैद झाली. आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरलही झाला. दरम्यान ईशान किशननं हे घडल्यानंतर माफीही मागितली. पण अक्षरच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. सुदैवानं या सगळ्यात त्याला दुखापत झाली नाही हे महत्वाचं. त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
टीम इंडियाची विजयी आघाडी दरम्यान लोकेश राहुलच्या टीम इंडियानं हरारेतले पहिले दोन्ही वन डे सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. शुभमन गिल आणि शिखर धवनच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर भारतीय संघानं पहिला सामना तब्बल 10 विकेट्सनी जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघानं 5 विकेट्सनी यजमान संघाला धूळ चारली. या मालिकेतील अखेरचा सामना उद्या दुपारी खेळवला जाणार आहे. त्यात भारतीय संघात बदल अपेक्षित आहेत.