शारजाह, 7 सप्टेंबर : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या (Pakistan vs Afghanistan) मॅचवर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा विजय झाला तर टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश करू शकते. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर पाकिस्तानी बॉलर्सनी अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 129/6 वर रोखलं. या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या पाकिस्तानची सुरूवात अत्यंत खराब झाली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाबरची गोल्डन डकवर आऊट होण्याची ही दुसरीच वेळ आहे. फजल हक फारुकीने बाबर आझमला एलबीडब्ल्यू केलं. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झादरानने सर्वाधिक 35 रन केले, तर हजरतुल्लाह झझई 21, गुरबाझ 17 रनवर आऊट झाले. राशिद खान 18 रनवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून हारिस राऊफला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या. तर नसीम शाह, मोहम्मद हसनेन, नवाझ आणि शादाब खान यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. आशिया कपच्या सुपर-4 राऊंडमध्ये भारताचा पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला आहे, त्यामुळे रोहित शर्माच्या टीमचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. भारताला आशिया कपच्या फायनलमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव करणं गरजेचं आहे, यानंतर भारताला अफगाणिस्तानला हरवावं लागणार आहे.