दुबई, 29 ऑगस्ट : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा (India vs Pakistan) रोमांचक विजय झाला. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने पाकिस्तानला 147 रनवर ऑल आऊट केलं. भुवनेश्वर कुमारने 4 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट घेतल्या. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. केएल राहुल पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला, पण हार्दिक आणि जडेजाने भारताला विजय मिळवून दिला. हार्दिकने 17 बॉलमध्ये 194.12 च्या स्ट्राईक रेटने 33 रन केले, यामध्ये 4 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. तर जडेजाने 29 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 35 रन केले. मॅच संपल्यानंतर कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) मुलाखत घेतली. जडेजाची मुलाखत घेताना मांजरेकर यांनी जडेजाला माझ्याशी बोलायला तुला काहीही हरकत नाही ना? असं मांजरेकरांनी जडेजाला विचारलं. यावर जडेजाने डेफिनेटली म्हणजे नक्कीच असं उत्तर दिलं. मांजरेकर-जडेजा वाद 2019 वर्ल्ड कप दरम्यान संजय मांजरेकर यांनी जडेजा बिट्स ऍण्ड पिसेस म्हणजेच थोडी बॅटिंग आणि थोडी बॉलिंग करणारा खेळाडू असल्याचं वक्तव्य केलं होतं. जडेजाला मांजरेकर यांचं हे वक्तव्य अजिबात आवडलं नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये 77 रनची खेळी करून जडेजाने बॅटने तलवारबाजी केली. हे सेलिब्रेशन म्हणजे मांजरेकर यांनाच इशारा होता, असं जडेजानं नंतर स्पष्ट केले होते. मांजरेकरांच्या बिट्स ऍण्ड पिसेस वक्तव्यावरून जडेजा प्रचंड नाराज झाला होता. ‘तरी मी तुझ्यापेक्षा दुप्पट मॅच जास्त खेळलो आणि खेळतही आहे. लोकांचा सन्मान करायला शिक. मी तुझ्याकडून खूप ऐकलं आहे,’ असं ट्वीट जडेजाने केलं होतं. 2019 वर्ल्ड कपमधल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनलमधल्या जडेजाच्या खेळीनंतर मांजरेकरांनी त्याची माफीही मागितली होती.