India vs Pakistan Babar Azam
दुबई, 28 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये आज सामना होत आहे. दोन्ही टीमचा यंदाच्या आशिया कपमधला हा पहिलाच सामना आहे, त्यामुळे दोन्ही टीम विजयाने स्पर्धेची सुरूवात करण्यासाठी आग्रही असतील. भारताविरुद्धच्या मॅचआधी पाकिस्तानला मोठा धक्का लागला आहे. डावखुरा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर झाला आहे, त्यामुळे भारताचं पारडं जड दिसत आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमलाही (Babar Azam) याची कल्पना आहे, त्यामुळे तो वारंवार शाहिन आफ्रिदीची कमतरता जाणवेल, असं सांगत आहे. भारताला हरवण्यासाठी बाबर आझमने टीमला गुरूमंत्र दिला. याचा एक व्हिडिओ पीसीबीने शेअर केला आहे. बाबर आझमने या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मिळवलेला विजय आठवून दिला. ‘तुम्ही भारताविरुद्धचा मागचा सामना लक्षात ठेवा. आपण ज्या बॉडी लँग्वेजने आणि जोशात वर्ल्ड कपमध्ये खेळलो होतो, ते आठवा. तुम्ही त्या मॅचचा विचार केलात तर तुमची तयारी त्याच दिशेने जाईल. तुमचा स्वत:वरचा विश्वास वाढेल. तुम्ही नेटमध्ये ज्या विचाराने प्रॅक्टीस कराल, तेच मैदानात दिसेल, त्यामुळे वारंवार भारताविरुद्धची टी-20 वर्ल्ड कपची मॅच आठवा आणि तयारी करा,’ असं बाबर म्हणाला.
‘आपला मुख्य बॉलर शाहिन आफ्रिदी आपल्यासोबत नाही, हे मला माहिती आहे. बाकीचे फास्ट बॉलर शाहिनची कमतरता जाणवून देणार नाहीत. शाहिनने जशी पाकिस्तानसाठी कामगिरी केली, तशीच तुम्हीही करून दाखवा, ज्यामुळे त्याची कमतरता जाणवणार नाही,’ असं वक्तव्य पाकिस्तानच्या कर्णधाराने केलं. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये शाहिन आफ्रिदीमुळे भारताची टॉप ऑर्डर कोसळली होती. शाहिनने रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलची विकेट घेतली होती, त्यामुळे भारताला फक्त 151 रन करता आले. या आव्हानाचा पाठलाग पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पार केला. बाबर आझमने नाबाद 68 आणि मोहम्मद रिझवानने 79 रन केले होते.