देव दिवाळी
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर: उत्तर भारतात दर वर्षी कार्तिक महिन्यातल्या पौर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते. या दिवशी वाराणसीमध्ये, विशेषतः गंगा नदीच्या तीरावर पूजा आणि दीपदान केलं जातं. या विधीमुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि गंगामातेचा आशीर्वाद प्राप्त होतो, असं मानलं जातं. या दिवशी प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या काशीतली सर्व मंदिरं आणि घाट दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतात. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सर्व देव-देवता काशीमध्ये दिवा प्रज्ज्वलित करून भगवान शंकराची पूजा करतात. पुरी इथल्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्रा यांनी देवदिवाळीची तिथी आणि मुहूर्ताविषयी माहिती दिली आहे. याविषयी जाणून घेऊ या. देवदिवाळी तिथी 2022 उत्तर भारतीय पंचांगानुसार, यंदा सोमवारी (7 नोव्हेंबर) सायंकाळी चार वाजून 15 मिनिटांपासून कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेस प्रारंभ होत आहे. ही तिथी 8 नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल. देवदिवाळीकरिता कार्तिक पौर्णिमा तिथीसाठीचा मुहूर्त प्रदोष कालावधीत 7 नोव्हेंबरला असल्याने या दिवशीच देवदिवाळी साजरी होणार आहे. 7 नोव्हेंबरला देवदिवाळीचा मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 14 मिनिटांपासून ते 7 वाजून 49 मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी देवदिवाळीसाठी अडीच तांसाहून अधिक काळ शुभमुहूर्त असेल. हेही वाचा - कार्तिक एकादशीपासून चातुर्मास संपला; शुभ कार्याला सुरुवात, जाणून घ्या विवाह-गृहप्रवेशाचे मुहूर्त सिद्धी आणि रवी योगात देवदिवाळी देवदिवाळीच्या दिवशी रवी आणि सिद्धी योग आहेत. 7 नोव्हेंबरला सकाळपासून ते रात्री 10 वाजून 37 मिनिटांपर्यंत सिद्धी योग आहे. तसंच या दिवशी सकाळी 6 वाजून 37 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांपर्यंत रवी योग आहे. हे दोन्ही योग शुभकार्यांसाठी उत्तम मानले जातात. देवदिवाळीचं धार्मिक महत्त्व याबद्दल काही पौराणिक कथा आहेत. त्रिपुरासुर राक्षसाचे अत्याचार आणि अधर्मामुळे पृथ्वी, स्वर्ग आणि नरक अशा तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजला होता. यापासून मुक्ती मिळावी, यासाठी सर्व देवतांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली. यानुसार भगवान शंकराने कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला. यामुळे सर्व देव-देवता प्रसन्न झाले आणि ते भगवान शंकराची नगरी असलेल्या काशीत आले. सर्वांनी आनंदोत्सव साजरा करून दीपदान केलं. तेव्हापासून दर वर्षी कार्तिक पौर्णिमेला देवदिवाळी साजरी केली जाते. दर वर्षी कार्तिक पौर्णिमेला सर्व देव-देवता काशीमध्ये येऊन दीपदान करतात, असं मानलं जातं. या दिवशी काशीत शिवपूजा आणि दीपदानाला विशेष महत्त्व असतं. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदीपावली साजरी केली जाते. यंदा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा 24 नोव्हेंबर 2022 रोजी आहे.