संसद भवन उद्घाटनाच्या कार्यक्रमावर शरद पवार नाराज
पुणे, 28 मे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मी सकाळी संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर मी या कार्यक्रमाला गेलो नाही याचं मला समाधान वाटलं. उद्घाटनावेळी जे कर्मकांड सूरू होतं, त्यावरून असं वाटतं की नेहरूंनी जी आधुनिक लोकशाहीची संकल्पना मांडली होती, त्या संकल्पनेपासून देश मागे जात असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ‘राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना निमंत्रण हवं होतं’ पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, नेहरूंनी जी आधुनिक लोकशाहीची संकल्पना मांडली होती, त्या संकल्पनेपेक्षा आत्ताची पंरपरा ही फार वेगळी आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या भाषणापासून अधिवेशन सुरू होते. त्यामुळे या कार्यक्रमाला त्यांना बोलवायला पाहिजे होते. मी राज्यसभेचा सदस्य आहे आणि त्याच सभागृहाचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. हा कार्यक्रम मर्यादीत लोकांसाठी होता असं वाटत असल्याचा टोला यावेळी पवारांनी लगावला आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी त्यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणूक होईल असं वाटत आहे. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे, अशा उमेदवाराला मविआकडून तिकीट दिलं जाईल. महाविकास आघाडीतील घटक पक्ष यावर चर्चा करून निर्णय घेतील. तोपर्यंत ज्यांना दावा करायचा आहे, त्यांना करू द्या त्याने काही फरक पडत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जमालगोटा वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी चांगलाच टोला लगावला. त्यांची भाषा त्यांनाच शोभते त्यावर बोलणं उचित नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.