पुणे, 29 जानेवारी : सोलापूर-पुणे महामार्गावर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीमध्ये भीषण अपघात झाला आहे. राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी सोलापूरच्या दिशेने निघालेली बोलेरो गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे लेन सोडून दुसऱ्या बाजूला आली. ही गाडी दुभाजक ओलांडून पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर आदळल्याची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत, यातल्या एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती तिकडे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना लोणी काळभोर इथल्या एका बड्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी साडेतीन-चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या दिशेने बोलेरो गाडीतून दोघेजण निघाले होते. याचवेळी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडरला जाऊन धडकली.
डिव्हायडरला धडकल्यानंतर गाडीने तीन पलट्या मारल्या आणि पुण्याच्या बाजूने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर जाऊन आदळली. यामध्ये चारचाकी चालकाच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून कार पलटल्यानंतर चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोलेरो गाडीतील दोघांनाही स्थानिकांच्या मदतीने लोणी काळभोरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. थेऊर फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.