पुणे, 13 जुलै: कोरोनाविरोधी लढ्यात आता पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Pune serum institute of india) आणखी एक पाऊल टाकलं आहे. पुण्यात तिसरी कोरोना लस तयार होणार आहे. ऑक्सफोर्ड, नोवोवॅक्सच्या कोरोना लशीनंतर आता रशियाची कोरोना लसही (Russian corona vaccine) पुण्यात तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये रशियन कोरोना लस स्पुतनिक V (Sputik V) चं उत्पादन घेण्याची घोषणा कंपनीने केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडशी (आरडीआईएफ) करार केला आहे. सीरम सप्टेंबरपासून रशियाच्या स्पतुनिक लशीचं उत्पादन सुरू करेल. यासाठी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात दरवर्षी या लशीच्या 300 दशलक्षपेक्षा अधिक डोसची निर्मिती करण्याचं लक्ष्य आहे. या लशीची पहिली बॅच सप्टेंबर 2021 मध्ये मिळण्याची अपेक्षा आहे. हे वाचा - लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका कमी : WHO ही लस Coronavirus विरोधात 91.6 टक्के प्रभावी असल्याची नोंद ऑगस्टमध्ये करण्यात आली आहे. रशियाने सर्वात प्रथम या लशीला मंजुरी दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून ही लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. या लशीचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतर 28 ते 42 व्या दिवसांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात होते. हे वाचा - Covaxin की Covishield; प्रेग्नन्सीत कोणती कोरोना लस घ्यायची? सीरम इन्स्टिट्यूटने सर्वात आधी ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविशिल्ड कोरोना लशीचं भारतात उत्पादन सुरू केलं. ही लस सध्या लसीकरणात दिली जात आहे. तर अमेरिकेतील नोवोवॅक्स (Novavax) कंपनीची NVX-CoV2373 म्हणजेच कोवोवॅक्स (Covovax) लशीचं उत्पादन सुरू झालं आहे. कोवोवॅक्स लशीच्या पहिल्या बॅचचं उत्पादन सुरू झाल्याची माहिती जूनच्या शेवटच्या आठवड्यात कंपनीने दिली होती. त्यामुळे स्पुतनिक V ही पुण्यात तयार होणारी आता तिसरी कोरोना लस आहे.