पुणे, 31 मे: मागील दीड महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख काही प्रमाणात खालच्या दिशेने वळला आहे. पण कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd wave) तरुणांसाठीही अत्यंत घातक ठरली आहे. परिणामी देशात अनेक तरुणांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. अशातच वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा (Corona virus 3rd wave alert) इशारा दिला आहे. कोरोना विषाणूची तिसरी लाट लहान मुलांसाठी अनेक पटीने घातक ठरेल, असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी पुणे सज्ज झालं आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 82 रुग्णालयांमध्ये एकूण 8 हजार 77 बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील आणखी 15 खासगी रुग्णालये ही पूर्ण क्षमतेनं फक्त लहान मुलांवर उपचारासाठी कार्यान्वित करण्याचं आयोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या एकूण खाटांपैकी 7 हजार 939 खाटा साध्या असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये 494 आयसीयू बेड्स, 183 व्हेंटिलेटर बेड तर 138 ऑक्सिजन बेड असणार आहेत. हे बेड प्रामुख्याने पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशाप्रकारे पुणे जिल्हा प्रशासनाने येणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन पूर्वतयारी केली आहे. हे ही वाचा- काळजी घ्या! राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यात घोंघावतेय कोरोनाची तिसरी लाट मागील काही दिवसांपासून पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. असं असलं तरी कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळला नाही. कोरोना नियमांत काही प्रमाणात शिथिलता दिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू शकतो. तसेच येत्या काही महिन्यांत कोरोना विषाणूची तिसरी लाटही येऊ शकते. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.