शरद पवार
पुणे, 6 जून : आज राज्यभरात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. पुण्यातील ऐतिहासिक लालमहालात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, देशात अनेक राजवटी होऊ गेल्या त्या सर्व घराण्याच्या नावाने ओळखल्या जातात. मात्र शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी आपल्या राज्याला भोसलेंचं राज्य केलं नाही. शिवरायांनी रयतेचं राज्य चालवलं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार नेमकं काय म्हणाले? देशात अनेक राजे होऊन गेले, मात्र शिवरायांचं राज्य सर्वसामान्यांसाठी होतं. इतर राज्य हे त्यांच्या घराण्याच्या नावावरून ओळखली जातात. मात्र शिवरायांनी भोसलेंचं राज्य केलं नाही तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सत्ता कशी कोणासाठी वापरायची याचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवराय. हा ऐतिसासिक असा दिवस आहे. याच दिवशी महाराजांनी राज्यकारभार स्विकारला असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. रायगडावर शिवभक्तांची गर्दी दरम्यान दुसरीकडे आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी यंदा भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने रायगडावर येत आहेत. काही ठिकाणी तर विशेष गाड्या देखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टी असल्या तरी काही भाविकांना मात्र गडावर जाता आलं नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.भाविकांच्या गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ती नियंत्रणात आणणं हे देखील पोलीस प्रशासनासमोरचं आव्हान आहे. नाईलाजाने असंख्य शिवभक्त माघारी फिरले आहेत. दुर्गराज रायगडावर सध्या जवळपास अडीच लाख भाविक जमले आहेत. गडाच्या खाली जवळपास 50- 75 हजार भाविक आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे.