पुणे, 28 ऑक्टोबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील (Mumbai Cruise drug case) पंच असलेला किरण गोसावी (Kiran Gosavi) याला अखेर पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. किरण गोसावी याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. किरण गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अखेर आज पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी अटकेची कारवाई करण्यापूर्वीचा किरण गोसावीचा एक व्हिडीओ (Kiran Gosavi Video) समोर आला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलने केलेल्या वसुलीच्या आरोपांनंतर किरण गोसावी फरार झाला होता. अखेर त्याला पोलिसांनी अटक कलेी आहे. अटकेपूर्वीचा किरण गोसावीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतून किरण गोसावी याने आपल्यावरील आरोप फेटाळले असून प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन भावांची चौकशी करण्याची मागणी या व्हिडीओतून किरण गोसावीने केली आहे.
आपल्या व्हिडीओ किरण गोसावी सांगत आहे की, प्रभाकर साईल जो काही सांगत आहे की “पैशांच्या देवण-घेवाणवरुन, सॅम डिसोझा सोबत संभाषण कुणाचं संभाषण झालं आहे. कोणी किती पैसे घेतले आहेत. प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत हे त्याच्या मोबाइलवरुन समजेल. प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल चॅट काढावेत. माझे सुद्धा त्याच्यासोबतचे चॅट काढावेत. माझा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे पूर्वीचे काही चॅट्स असतील ज्यात पैशांच्या देवाण-घेवाण बाबत म्हटलं आहे. पण 2 तारखेनंतरचे याचे चॅट्स तपासावेत. मुंबई पोलिसांनी याची चौकशी करावी, डिलिट केलेले चॅट काढावे. याच्या मागे कोण आहे याचीही चौकशी करावी. यांचे फोन रेकॉर्ड्स काढा सर्व गोष्टी समजतील. त्याने केलेले सर्व आरोप खोटे आहेत.” वाचा : समीर वानखेडेंची जवळपास साडे चार तास चौकशी किरण गोसावीवर गुन्हे दाखल किरण गोसावीवर आधीच विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहे. पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर तो फरार आरोपी आहे. मलेशियातील हॉटेलमध्ये नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी याने 3 लाख रूपये उकळल्याचा गुन्हा चिन्मय देशमुख यांनी 2018 साली पुणे पोलिसात दाखल केला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथक तयार केली होती. किरण गोसावीवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे तर तिसरा गुन्हा अंधेरीतील पोलीस ठाण्यात दाखल आहे. किरण गोसावीच्या असिस्टंटला अटक तर दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी याच फसवणुकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांनी अटक केली होती. शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव आहे. 2018 मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मधे दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्हयात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली होती.