गिरीश बापट, आनंद दवे
पुणे, 17 फेब्रुवारी : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. भाजपकडून या जागेवर यावेळी टिळक वाड्याला डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धंगेकर यांनी भाजपसमोर कसब्यात तगडं आव्हान निर्माण केल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न मिळाल्यानं पुण्यातील ब्राह्मण समाज देखील भाजपवर नाराज आहे. त्यामुळे कसब्यात भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. प्रचार न करण्याचा निर्णय भाजप नेते गिरीश बापट हे आजारी आहेत, त्यामुळे ते प्रचारात सक्रिय झाले नव्हते. मात्र निवडणुकीचं वातावरण बघता ते देखील आता प्रचारात सहभागी झाले आहेत. यावर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बापट पाहून पर्रीकरांची आठव झाली. बापट साहेबांना त्रास होत आहे, तरी देखील ते प्रचारात उतरले आहेत. त्रास बापट साहेबांना होतो मात्र त्यांच्या यातना आम्हाला जाणवतात. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे, याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिश: प्रचार करणार नसल्याचं’ दवे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले आम्हाला विश्वास.., विरोधकांनाही लगावला टोला चिंचवडमध्ये तिरंगी लढत कसब्यामध्ये काँग्रेसनं भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी सामना होणार आहे. मात्र राहुल कलाटे यांच्या उमेदवारीचा फटका हा महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता अधिक आहे.