नाशिक, मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता पुण्यातही डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव झाला आहे.
पुणे, 14 ऑगस्ट: आता कुठेतरी महाराष्ट्र राज्य कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून (Corona Virus 2nd Wave) सावरत आहे. तोपर्यंत आता कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरियंटचं नवं संकट राज्यासमोर उभं ठाकलं आहे. नाशिक, मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता पुण्यातही डेल्टा प्लस विषाणूचा (Delta Plus variant) शिरकाव झाला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेल्टा प्लस संसर्गाचे रुग्ण आढळल्यानंतर आता शहरातही एक रुग्ण आढळला आहे. डेल्टा प्लस व्हेरिअंटबाधित कोरोना रूग्ण आढळून आल्यानं जिल्ह्यातील आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे. तातडीनं पावलं उचलत प्रशासनानं रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे. हडपसर मुंढवा परिसरात हा डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला असून पालिकेनं त्याला होम आयसोलेशनमध्येच ठेवलं आहे. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य मित्र आणि नातेवाईकाचं शोध घेतला जात आहे. हेही वाचा- ‘लस घेऊनही 18 जणांना डेल्टा प्लसची लागण; ते 5 मृत्यू या व्हेरिएंटमुळे नाही’ खरंतर, गेल्या महिन्यात पुण्याच्या ग्रामीण भागात डेल्टा प्लसचे 5 रूग्ण आढळले आहे. सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. संबंधित पाचही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जुन्नर आणि खेडमध्ये प्रत्येक एक डेल्टा प्लस व्हेरिअंटचा रुग्ण आढळला आहेत. तर सर्वाधिक 3 रुग्ण पुरंदर तालुक्यात आढळले आहेत. यानंतर आता ग्रामीण भागापाठोपाठ शहरातही डेल्टा प्लस विषाणूनं शिरकाव केला आहे. आता पुणे जिल्ह्यातील डेल्टा प्लस रूग्णांची संख्या आता 6 वर गेली आहे.