ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने सगळीकडेच खळबळ उडवली आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. महाजनी यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
रवींद्र महाजनी तळेगाव दाभाडे येथील आंबी गावात भाड्याने घर घेऊन राहात होते. ते राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र हे मृतावस्थेत आढळले.
गेल्या आठ महिन्यांपासून ते या सदनिकेत एकटेच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. महाजनी यांचा शेवटचा संवाद कोणाशी आणि कधी झाला याविषयीची माहिती समोर आली आहे.
मागील 3 दिवसापासून रवींद्र महाजनी हे घरातच पडून होते. गेल्या काही महिन्यांपासून ते भाडे तत्वावर राहत होते. मात्र शेजारी राहणाऱ्यांना देखील अभिनेते असल्याचे माहीत नव्हते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनीच पोलिसांना कळवले.
“मंगळवारी मी त्यांना शेवटचं पाहिलं. त्यादिवशी त्यांनी माझ्या हातात कचरा दिला. बुधवारी माझा वीकली ऑफ होता. गुरुवारी ते झोपले असावेत या विचाराने मी दार ठोठावलं नाही. त्यांनी कचरा बाहेर ठेवला नव्हता. मी निघून गेले. त्यानंतर शुक्रवारी जेव्हा मी आले तेव्हा दोन दिवसाचा कचरा असेल म्हणून दार ठोठावलं. पण आतून मला काहीच उत्तर मिळालं नाही”, असं सफाई कर्मचारी आदिका वारंगे यांनी सांगितलं.
रवींद्र महाजनी यांनी सफाई कर्मचारी महिलेशी शेवटचा संवाद साधला होता. मंगळवार नंतर महाजनी यांनी फ्लॅटचे दारच उघडले नाही. मी या इमारतीत दररोज कचरा घ्यायला यायचे. कचरा देताना ते थोडंफार बोलायचे. त्याशिवाय माझा त्यांच्याशी काही संवाद झाला नाही. कचरा घ्यायला आल्यावर वास येऊ लागला तेव्हा मी माझ्या सरांना याबद्दलची माहिती दिली. नेहमी मी दरवाजा ठोकल्यानंतर त्यांचा आवाज यायचा, पण शुक्रवारी आतून काही आवाजही दिला नाही, असंही वारंगे यांनी सांगितलं.
अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. त्यानंतर त्यांचं बालपण मुंबईत गेलं. पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तसेच त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.