भास्कर मेहरे, यवतमाळ, 16 फेब्रुवारी : यवतमाळमधील जोडमोहा ते कळंब मार्गावरील वाढोना खुर्द येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले असून 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जोडमोहा येथील काही दिवसांपूर्वी निधन झालेल्या बाबाराव वानखडे यांच्या अस्थी विसर्जनासाठी त्यांचे नातेवाईक कोटेश्वरला जात होते. अस्थी विसर्जनानंतर ते परत येत असताना वाढोना गावाजवळ टाटा मॅजिक गाडीच्या चालकाचेनियंत्रण सुटले. त्यामुळे ही गाडी झाडावर जाऊन आदळली आणि नंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडली. हा अपघात इतका भीषण होता की या वाहनातून प्रवास करणाऱ्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 14 जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतकांची नावे : 1)अमर आत्राम, जोडमोहा 2)किसना पारसणकर, जोडमोहा 3)महादेव चांदनकर, जोडमोहा 4)अंजनी वानखडे, जोडमोहा 5)सरस्वती दाभेकर अन्य दोन मृतांची नावे अद्याप स्पष्ट झाली नाहीत. दरम्यान, बाबाराव वानखडे यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. त्यानंतर आता बाबाराव यांच्या अस्थी विसर्जनाला जातानाच घडलेल्या अपघातात नातेवाईकांमधील 6 जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसंच या घटनेमुळे जोडमोहा गावावर दुखःचं सावट पसरलं आहे.