मुंबई, 22 मार्च : आज देशभरातून जनता कर्फ्यूला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी गच्चीवर, घराबाहेर व बालकनीजवळ येऊन टाळ्या, थाळ्या वाजवत कोरोनाशी दोन हात करणारे डॉक्टर, पोलीस आणि प्रशासनाचे आभार मानले. सध्या देश जीवघेण्या कोरोना या आजाराचा सामना करीत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू करण्याचं आवाहन केलं होतं. आज जनता कर्फ्लूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी घंटानाद, टाळा - थाळ्या वाटवित सर्व प्रशासनाचे आभार मानले. यामध्ये सर्वसामान्यांबरोबरच अभिनेते आणि राजकीय व्यक्तीदेखील सहभागी झाले. शरद पवारांनी एक व्हिडीओ समाज माध्यमाद्वारे शेअर केला आहे. यामध्ये पवार आपल्या कुटुंबीयांसमवेत घराबाहेर येऊन टाळ्या वाजवील्या व डॉक्टर, पोलीस आणि प्रशासनाचे आभार मानले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबीयांसह थाळ्या वाजवून धन्यवाद व्यक्त केले. याशिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बालकनीतून थाळी वाजवीत सर्व कोरोनाशी लढणाऱ्यांना धन्यवाद दिले.
याबरोबरच अभिताभ बच्चन यांनीही कुटुंबीयांसह घराच्या गच्चीवर जाऊन टाळ्या वाजवित कोरोनाशी लढणाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री ऐर्श्वर्या बच्चनही टाळ्या वाजविताना दिसले. त्यांचे व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.