नवी दिल्ली, 23 जुलै : टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात चाहत्यांना प्रचंड रोमांच पाहायला मिळाला. भारताकडून कर्णधार शिखर धवनने शानदार 97 धावांची खेळी केली, तर शुभमन गिलनेही 64 धावांची खेळी केली. या सामन्यात शुभमन गिलने ज्या प्रकारे विकेट गमावली त्यामुळे चाहते आणि क्रीडा समीक्षकही खूप नाराज (IndvsWI) झाले. शुभमन गिलने आळस दाखवल्याने त्याच्या धावबाद होण्यावरून अनेकांनी टिका केली. तो धाव पूर्ण करण्याइतपत वेगाने धावू शकला असता, पण त्याने थोडा आळस दाखवला आणि चांगली फलंदाजी करत असताना विकेट गमावली. भारताच्या डावातील 18 व्या षटकात जेव्हा शुभमन गिल मिडविकेटच्या दिशेने हलका शॉट खेळला आणि धाव घेताना बाद झाला. शिखर धवनने धाव पटकन पूर्ण केली, पण शुभमन गिलने येथे थोडी ढिलाई दाखवली आणि तो संथ गतीने धावला. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने ही संधी सोडली नाही, उत्कृष्ठ फेकीवर त्यानं शुभमन गिलला धावबाद केलं. हे वाचा - हे आहेत कसोटी क्रिकेटमधील टॉप सिक्सर; भारतातील कोण आहे यादीत? शुभमन गिलच्या निष्काळजीपणावर चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली. एका चाहत्याने लिहिले की, एकेरी धाव घेताना त्यानं निष्काळजीपणा दाखवला, शाळेच्या मुलाप्रमाणे धावला तो, थ्रो होणार नाही अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.
या चाहत्याने निकोलसचे कौतुक केलं आहे. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, जर त्याला टीम इंडियासाठी खेळायचे असेल तर अधिक लक्ष केंद्रित करावं लागेल. अनेक क्रिकेटप्रेमींनी निष्काळजीपणाबद्दल त्याला फटकारले आहे. हे वाचा - केएल राहुलच्या अडचणी संपेना, आता कोरोनाची लागण, T20 सीरिजमधून बाहेर! दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 308 धावा केल्या, भारताकडून कर्णधार शिखर धवनने 97 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनेही 305 धावा केल्या आणि अखेरच्या षटकात सामन्याचा निकाल लागला.
शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 15 धावांची गरज होती, मोहम्मद सिराजने भारताकडून गोलंदाजी करत सामना वाचवला. टीम इंडियाने अखेर हा सामना 3 धावांनी जिंकला.