रुरकी, 9 मे : उत्तराखंड राज्यातील रुरकी रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना (Roorkee Railway Station) धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात लक्सर, नजीबाबाद, डेहराडून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार या रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. (Threatening Letter) हे धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी (Jaish E Mohammad Area Commander) असल्याचे सांगितले आहे. पत्रात नेमके काय? मिळालेल्या माहितीनुसार, रुरकी रेल्वे स्थानक अधीक्षकांना शनिवारी संध्याकाळी एक धमकीचे पत्र मिळाले, ते अत्यंत तुटक्या हिंदीत लिहिलेले आहे. यामध्ये उत्तराखंडच्या 6 रेल्वे स्थानकांसोबतच हरिद्वारमधील मंशा देवी, चंडी देवी आणि अन्य धार्मिक स्थळांनाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रात उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात उत्तराखंडमधील रेल्वे स्थानकांसह प्रमुख ठिकाणी दक्षता वाढवण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे काय म्हणणे? यासंदर्भात माहिती देताना उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, रुरकी रेल्वे स्थानक अधीक्षकांना 7 मे रोजी संध्याकाळी लक्सर, नजीबाबाद, डेहरादून, रुरकी, ऋषिकेश आणि हरिद्वार या 6 रेल्वे स्थानकांना उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळाले. यासोबतच त्यांनी सांगितले की, ‘धमकीचे पत्र जैशचा एरिया कमांडर सलीम अन्सारीच्या नावाने पाठवण्यात आले होते.’ एएनआय या वृत्तसंस्थेसोबत केलेल्या संभाषणात त्यांनी सांगितले की, ‘हा एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती आहे, जो गेल्या 20 वर्षांपासून अशीच धमकीची पत्रे पाठवत आहे. तरीही खबरदारी घेतली जात आहे.’ हेही वाचा - Asani Cyclone: ‘Asani’चे तीव्र चक्री वादळात रूपांतर, या तीन राज्यांना High Alert
2019 मध्येही मिळाले होते पत्र -
या धमकीच्या पत्राची माहिती मिळताच डेहरादून ते हरिद्वारपर्यंत दक्षता वाढवण्यात आली आहे. मात्र, यापूर्वीही त्यांना अशी धमकीची पत्रे आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रुरकी रेल्वे स्टेशन अधीक्षकांना एप्रिल 2019 मध्ये असेच धमकीचे पत्र मिळाले होते. अशा स्थितीत पोलिसांनी यापूर्वी मिळालेल्या अशा धमकीच्या पत्रांचे हस्ताक्षर जुळवताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.