मुंबई, 29 ऑगस्ट : देशात अंतिम परिक्षा रद्द होणार नाहीत असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. त्यांनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकास्त्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली. यावर आता रोहित पवार यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे. ‘आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण आशिष शेलारीजी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं असा खोचक टोळा रोहित पवारांनी लगावला आहे. तर एका “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला, विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले, शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. यावर रोहित पवार यांनी चोख उत्तर दिलं आहे.
‘त्यांना हिशेब येत नाही…’, रोहित पवारांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनीही रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. सगळ्या गोष्टीचं क्रेडिट घेणारं केंद्र सरकार स्वतःच्या अंगावर आलं की राज्यांना ‘क्रेडिट’ घ्यायला सांगत आहे. हे फक्त राज्याच्या हक्काच्या GST च्या बाबतीतच नाही तर इतरही अनेक गोष्टीत पहायला मिळतं. असं कसं चालेल?,’ असं ट्वीट करत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. रोहित पवारांच्या या टीकेला भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘राज्याचे कुठलेही पैसे केंद्राकडे अडकून नाहीत. रोहित पवार यांना हिशेब समजत नाही,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीसांच्या या प्रत्युत्तरानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद रंगण्याची शक्यता आहे.