नाशिक, 25 एप्रिल : एकीकडे कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सगळी व्यवस्था कामाला लागली असताना नाशिकमध्ये एका झोपडपट्टीला आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागण्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या आगीच्या लोळात पंचवीस ते तीस घर जळाली आहेत. नाशिकच्या सारडा सर्कलजवळ ही भीषण आग लागली आहे. आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे गंजमाळ भागातील झोपडपट्टी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमनगर परिसराला चहुबाजुनी या आगीनं घेरलं आहे.
आगीचा विळखा गावाला पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. जवळपास 150 घरं या भागात आहेत. दरम्यान, आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजलं नसून घटनास्थळी मदतकार्य सुरू झालं आहे.