माळशिरस, 24 एप्रिल : कोरोनाचं संकट महाराष्ट्रासह देशात गडद होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात समाजातील प्रत्येक घटक पुढे येत आहे. माळशिरस तालुक्यातील सुमारे 700 खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टर शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारी दवाखान्यांमधून सेवा देणार असल्याची माहिती डॉ. विवेक गुजर यांनी उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे दिली आहे. सध्या कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत असल्यामुळे शासकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर प्रचंड ताण पडतो आहे. शासनानेही खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत माळशिरस तालुक्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन व माळशिरस तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे सुमारे 700 डॉक्टर सदस्य माळशिरस तालुक्यातील अकलूज, पिलीव, नातेपुते, माळशिरस व वेळापूर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सेवा देणार आहेत. हेही वाचा- विद्यापीठांच्या परीक्षा कधी होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती सरकारी दवाखान्यांमध्ये येणारे ताप, सर्दी व खोकल्याचे पेशंट तपासायचे, तपासणी करताना त्यांच्या पाठीमागील प्रवासाची माहिती विचारुन घ्यायची, संशयित वाटत असेल तर त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवायचा. जेणेकरुन साध्या सर्दी खोकल्याच्या पेशंटमध्ये संशयीत रुग्ण मिसळू नयेत, याची काळजी घेतली जाणार आहे. संपादन - अक्षय शितोळे