Jaipur: Rajasthan Deputy Chief Minister Sachin Pilot addresses a press conference at Pradesh Congress Committee headquarter, in Jaipur, Monday, Jan 21, 2019. (PTI Photo) (PTI1_21_2019_000146B)
जयपूर 15 जुलै: राजस्थानमधल्या राजकीय (Rajasthan Political Crisis) नाट्याने आता वेगळं वळण घेतलं आहे. सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. मला मुख्यमंत्री करा अशी मागणी करणाऱ्या सचिन पायलट ((Sachin Pilot)) यांच्यावर त्यांनी बोचरी टीका केली आहे. फक्त उत्तम इंग्रजी बोलणं, माध्यमांना चांगले बाईट्स देणं आणि देखणं असणं म्हणजेच सर्वकाही नाही. तर तुमच्या मनात देशाबद्दल काय भावना आहेत. तुमची धोरणं, तत्वज्ञान काय आहे, तुमची बांधिलकी कुणासोबत आहे यासगळ्यांचा विचार केला जातो अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याबद्दल काँग्रेसने आता सचिन पायलट आणि त्यांच्या 19 समर्थक आमदारांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी यांनी सर्व 19 आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यावर तातडीने उत्तर दण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. तर सचिन पायलट यांनी गांधी घराण्यावर कुठलीही टीका न करता अशोक गेहलोत यांना टार्गेट केलं आहे. गेहलोत यांनीच आपल्याला सातत्याने डावललं असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे आता राजस्थानमध्ये पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सचिन पायलट हे आता पुढे काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आपण भाजपमध्ये जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र पायलट हे भाजपच्या दिल्लीतल्या बड्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये राजस्थानमधल्या काँग्रेस सरकारचं भवितव्य ठरणार आहे.