मुंबई, 17 फेब्रुवारी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी केलेल्या वक्तव्यावर सध्या नवा वाद सुरू झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहे. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यात बॉलीवूड अभिनेत्याही मागे राहिल्या नाहीत. अभिनेत्री सोनम कपूर यांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध तिने आपल्या ट्विटमध्ये केला आहे. रविवारी एका कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करीत होते. त्यादरम्यान ते म्हणाले, या दिवसात घटस्फोटांची अधिकतर प्रकरणं सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये दिसून येत आहे. कारण शिक्षण आणि संपन्नता अहंकार वाढवते. ज्याचा परिणाम म्हणजे कुटुंबे विभक्त होत आहेत. कुटुंबीयांसोबत कार्यक्रमात आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवतांनी हे विधान केलं आहे.
आरएसएसने जारी केलेल्या निवेदनात भागवत यांचे म्हणणे सांगण्यात आले की, “सध्या घटस्फोटाच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. लोक निरर्थक विषयांवर भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे जास्त आहेत, कारण शिक्षण आणि समृद्धीमुळे अहंकार वाढतो आणि परिणामी कुटुंबे विभक्त होतात. यामुळे समाजही खंडित होऊ शकतो कारण समाज देखील एक कुटुंब आहे. " या वक्तव्यावर अभिनेत्री सोनम कपूर हिने ट्विट केलं आहे. ‘कोणता समजूतदार माणूस असं म्हणतो?? प्रतिगामी मूर्खपणाचं विधान’ असं ट्विट सोनम कपूर हिने केलं आहे. तिच्या या ट्विटवर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत. मध्यरात्री साधारण 1 वाजून 20 मिनिटांनी सोनमने हे ट्विट केलं असून आतापर्यंत 843 जणांनी रिट्विट आणि साधारण 5 हजार जणांना लाइक केलं आहे. य़ावर अद्याप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.