नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : आज देशभरात राममंदिर भूमिपूजनानिमित्ताने आनंदोत्सव साजरा केला जात आहे. अनेकांनी आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारली आहे. मात्र अनेकांकडून यावर निराशा व्यक्त केली आहे. AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे राममंदिर भूमिपूजनाबाबत वारंवार वक्तव्य करीत आहेत. यावेळी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताने ते म्हणाले की, राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी प्रतिज्ञा घेतली होती, त्याचे उल्लंघन केलं आहे. त्यांनी राज्यघटनेची मूलभूत संरचना सेक्युलॅरिजम (धर्मनिरपक्षेता) चं उल्लंघन केलं आहे. आजचा दिवस हिंदुत्वाच्या यशाचा तर सेक्युलॅरिजमच्या पराभवाचा दिवस आहे, अशा शब्दात ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली.
अयोध्येत राम मंदिराचे आज भूमिपूजन पार पडले. देशभरात भाजपकडून ठिकठिकाणी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे एमआयएमचे खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. असदउद्दीन ओवेसी यांनी राम मंदिर भूमिपूजनानिमित्ताने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आणि पुढेही राहील’ असं मत व्यक्त केले आहे. ओवेसी यांनी या ट्वीटसोबत जुन्या बाबरी मशिदीचा आणि बाबरी मशीद पाडण्याचा फोटोही ट्वीट केला आहे.