JOIN US
मराठी बातम्या / देश / काँग्रेसमधल्या G23 बंडखोर नेत्यांना विभाजन हवंय का? 'अविश्वास' दर्शवल्यानंतर राहुल गांधींनी घेतली या नेत्याची भेट

काँग्रेसमधल्या G23 बंडखोर नेत्यांना विभाजन हवंय का? 'अविश्वास' दर्शवल्यानंतर राहुल गांधींनी घेतली या नेत्याची भेट

G23 नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वात सुधारणा करण्याच्या त्यांच्या मागणीबद्दल जोर धरला आहे. “सर्व स्तरांवर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व आणि निर्णय घेण्याचं मॉडेल स्वीकारणं हा काँग्रेससाठी एकमेव मार्ग आहे,” असं त्यांनी बैठकीनंतर म्हटलंय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 मार्च : काँग्रेस (Congress) पक्षातल्या बंडखोर नेत्यांच्या गटानं पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याच्या त्यांच्या मागणीवर ठाम राहून राहुल गांधी यांच्यावर “अविश्वासदर्शक ठराव” केला. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्षाच्या G23 गटाशी संपर्क साधला. पाच राज्यांतील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर प्रथमच G23 नेत्यांनी (काँग्रेसमधील बंडखोर नेत्यांचा समावेश असलेला गट) बुधवारी पक्षातले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या घरी बैठक घेतली. या वेळी उपस्थित असलेल्या शंकर सिंह वाघेला यांनी पक्ष नेतृत्वात फेरबदल करण्याचं पुन्हा आवाहन केलं. त्यांनी “राहुल गांधींवर विश्वास नाही", असंही सांगितलं. “आमचा राहुल गांधींवर विश्वास नाही. आज आझादजी (गुलाम नबी आझाद) सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना आमच्या मागण्या सांगणार आहेत. पक्षाला नवीन नेतृत्व पाहिजे. आम्हाला काँग्रेसचं भलं करायचं आहे. इतर नेते लवकरच आमच्यात सामील होतील,” असं वाघेला यांनी न्यूज18 ला सांगितलं. बंडखोर नेत्यांच्या गटानं पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्यावर अविश्वास दाखवल्यानंतर राहुल यांनी G23 गटाचा एक भाग असलेले ज्येष्ठ नेते भूपिंदर हुड्डा यांची भेट घेतली. हुड्डा यांनी ते पक्ष फोडण्याच्या बाजूनं नाहीत, असं म्हटल्याचं G23 गटातील घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितलं आहे. G23 नेत्यांनी पक्षाच्या नेतृत्वात सुधारणा करण्याच्या त्यांच्या मागणीबद्दल जोर धरला आहे. “सर्व स्तरांवर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व आणि निर्णय घेण्याचं मॉडेल स्वीकारणं हा काँग्रेससाठी एकमेव मार्ग आहे,” असं त्यांनी बैठकीनंतर म्हटलंय. बंडखोर G23 गटामध्ये असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी “एक सक्षम व्यक्ती बदल घडवून आणेल,” असं News18 ला सांगितलं. ‘त्यामुळं संघटना कार्यक्षम होईल. आम्ही काँग्रेसमध्ये आहोत. आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत आहोत,’ असंही ते म्हणाले. गुलाम नबी आझाद गुरुवारी 10 जनपथवर पक्षप्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. मात्र, गुलाम नबी आझाद आणि सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही, असं सूत्रांनी सांगितलं. हे वाचा -  45 हजार लोकं, VVIP ची गर्दी; असा असेल योगी आदित्यनाथांचा शपथविधी सोहळा G23 नेत्यांच्या गटाचं ‘सामूहिक आणि समावेशी नेतृत्वा’साठी आवाहन बुधवारी बैठक संपल्यानंतर, G23 नेत्यांनी सांगितलं की, सर्व स्तरांवर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व आणि निर्णय घेण्याचे मॉडेल स्वीकारणं हाच पक्षासाठी पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. काँग्रेसच्या G23 नेत्यांनी संयुक्त निवेदनात म्हटलंय की, ‘आम्ही काँग्रेस पक्षाच्या खालील सदस्यांनी विधानसभा निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या निकालांचे निराशाजनक परिणाम आणि आमचे कार्यकर्ते आणि नेते या दोघांचीही पक्षाला लागलेली सततची गळती यावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली." “काँग्रेसनं सर्व स्तरांवर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व आणि निर्णय घेण्याचं मॉडेल स्वीकारणं हाच एकमेव मार्ग आहे, असं आम्हाला वाटतं,” असं त्यात पुढं म्हटलंय. “भारतीय जनता पक्षाला (भाजप) टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष मजबूत करणं आवश्यक आहे. 2024 साठी विश्वासार्ह पर्यायाचा मार्ग मोकळा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यासाठी इतर समविचारी शक्तींशी संवाद सुरू करण्याची आम्ही काँग्रेस पक्षाला मागणी करतो आणि या संदर्भात पुढील पावलं लवकरच जाहीर केली जातील,” असं त्यामध्ये नमूद केलंय. हे वाचा -  भगवंत मान आज करणार मोठी घोषणा; Tweet करत म्हणाले, ‘इतिहासात आजवर…’ दरम्यान, आणखी एक बाब म्हणजे माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी स्वतःला G23 पासून दूर ठेवलंय. मोईली म्हणाले की, G23 ‘त्यांच्या निर्दिष्ट हेतू’पासून दूर गेले आहे. “मी सुधारणांसाठी त्यांच्या मेमोरँडमवर स्वाक्षरी केली,” असं मोईली म्हणाले. ‘मात्र, प्रतिव्यवस्था उभी केली जाऊ शकत नाही किंवा नेतृत्वावर भर रस्त्यावर उभं राहून शंका घेतली जाऊ शकत नाही’, असं ते पुढं म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या