उत्तराखंड, 7 फेब्रुवारी : उत्तराखंडमधील जोशी मठाजवळ हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली. हिमकडा कोसळून धरणाचा बांध फुटल्याने नदीला आलेल्या महापूरात अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. उत्तराखंडमधील दुर्देवी परिस्थितीवर मी सतत लक्ष ठेऊन आहे. संपूर्ण भारत तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. तसंच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी सतत संपर्कात असून एनडीआरएफचे जवान तैनात असून तेथील मदतकार्याविषयी माहिती घेत असल्याचं मोदींनी सांगितलं आहे.
हिमकडा नदीत कोसळल्याने पाण्याचा प्रवाह वाढला. काही लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून दिल्लीतूनही काही टीम रवाना झाल्या आहेत. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असल्याची माहिती अमित शहांनी दिली आहे.
तसंच, उत्तराखंडमधील सर्व रहिवाशांना आश्वस्त करतो की, नरेंद्र मोदी सरकार या संकटकाळात उत्तराखंडसोबत आहे. शक्य ती सर्व मदत करणार असून, उत्तराखंड या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आणि जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं शहा म्हणाले.
तसंच संध्याकाळी उत्तराखंडमध्ये दाखल होऊन परिस्थितीची पाहाणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कमीत कमी वेळेत ही स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणार असल्याचंही शहा म्हणाले.