JOIN US
मराठी बातम्या / देश / हिंदू-मुस्लीम ऐक्याची प्रचिती! राम मंदिरासाठी मुस्लीम उद्योजकानं दिलं 1 लाख रुपयांचं दान

हिंदू-मुस्लीम ऐक्याची प्रचिती! राम मंदिरासाठी मुस्लीम उद्योजकानं दिलं 1 लाख रुपयांचं दान

भारतीय संस्कृती किती प्रगल्भ आहे याची प्रचिती वेळोवेळी आली आहे. अनेक पिढ्यांपासून सुरू असणारा वाद बाजूला सारत अनेकांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याची आठवण करून दिली आहे. अशीच एक घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 17 फेब्रुवारी:  अयोध्येमध्ये श्रीरामांचे मंदिर (Ram Mandir in Ayodhya, Uttar Pradesh) निर्माणाधीन आहे. देशभरातून या मंदिराच्या निर्माणासाठी निधी गोळा केला जात आहे. स्वेच्छेने अनेक उद्योगपती, राजकारणी मंडळी आणि सामान्य नागरिकांनीही या मंदिरासाठी देणगी दिली आहे. हे देणगी अभियान संपूर्ण देशभरात राबवले जात आहे. दरम्यान तमिळनाडूमध्ये एका मुस्लीम उद्योजकाने राम मंदिरासाठी दिलेली देणगी पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. त्यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी 1 लाखाची देणगी दिली आहे. या मंदिराच्या निर्माणासाठी अगदी रस्त्यावर राहणारे व्यक्तीही देणगी देत असल्याचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे (SRJTK) ही देणगी दिली जात आहे. अगदी 10 रुपयांपासूनही लोकं दान देत आहेत. दरम्यान जेव्हा हिंदू मुन्नानीचे सदस्य, SRJTKच्या स्वयंसेवकांसमवेत तमिळनाडूमध्ये देणगी गोळा करत होते, तेव्हा डब्ल्यू एस हबीब यांच्याकडे देखील गेले. हबीब यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 1,00,008 रुपये राम मंदिर निर्माणासाठी देणगी म्हणून दिले आहेत. ही बाब सर्वांसाठी आश्चर्यकारक होती. (हे वाचा- EPFO कडून कर्मचाऱ्यांना मिळणार झटका? PF वरील व्याजदरात घट होण्याची शक्यता ) पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हबीब असे म्हणतात की, ‘मला हिंदू आणि मुस्लीम लोकांनामध्ये प्रेम वाढवण्याची इच्छा आहे. आपण सर्व देवाची मुलं आहोत या विश्वासाने मी ही रक्कम दान करत आहे.’ हबीब हे एक रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. त्यांनी हा देखील मुद्दा मांडला की मुस्लीम लोकांना हिंदू-विरोधी किंवा देशविरोधी मानले जाते, याबाबत त्यांना फार वाईट वाटते. चांगल्या हेतूसाठी दान करण्यात काहीच गैर नसल्याचे सांगत हबीब असे म्हणाले की, ‘मी इतर मंदिरात दान केले नसते परंतु दशकांपासून सुरू असलेला अयोध्या वाद संपल्यामुळे राम मंदिर वेगळे आहे.’ देशभरातून खेडोपाड्यात राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी देखील या कामासाठी पाच लाखांची देणगी दिली आहे. शिवाय अगदी 10-20 रुपयांपासून सामान्य माणसं देखील या कार्यात दान देत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून ही देणगी गोळा करण्याचे काम सुरू आहे. (हे वाचा- पार्टी आली अंगलट! एकाच अपार्टमेंटमधील 103 जणं कोरोना पॉझिटिव्ह ) राम मंदिर लोक सहभागातूनच उभारण्यात येत आहे. मंदिरासाठी केंद्र सरकार कसलीही आर्थिक मदत करणार नाही आहे. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत देशभरात राम मंदिरासाठी देणगी अभियान राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यात दीड लाख स्वयंसेवक सहभागी होतील, असंही रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांनी सांगितलं होतं. मुख्य मंदिरासाठी एकूण 300 कोटी खर्च तर संपूर्ण परिसर विकास धरुन 1100 कोटी खर्च अपेक्षित आहे. निधी संकलनाच्या दुसऱ्या दिवशीच पैसे बँकेत भरले जाणार आहेत. निधीचा गैरवापर होऊ नये याची पूर्ण काळजी घेण्यात येईल, असंही स्वामींनी सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या