नवी दिल्ली 23 सप्टेंबर: कृषी बिलावरून संसदेत सुरू झालेला विरोध अजुनही कायम आहे. सर्वच विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला असून गेल्या तीन दिवसांपासून संसद भवन परिसर आंदोलनांनी दणाणून गेला आहे. या प्रकरणावरून राज्यसभेतल्या विरोधी पक्षांच्या 8 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या खासदारांनी सोमवारी रात्रभर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मुक्काम ठोकला होता. त्यानंतर आज सर्व खासदारांनी महात्मा गांधी पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला. शेतकऱ्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतकरी विरोधी मोदी सरकारच्या विरोधात आमचा लढा असाच सुरूच राहील. बळीराजाला भांडवलदारांच्या स्वाधीन करण्याच्या मोदी सरकारचा डाव आम्ही हाणून पाडू, अशी प्रतिक्रिया विरोधी खासदारांनी व्यक्त केलीय. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्यासमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सभापती व्यंकय्या नायडू यांनी 8 ही खासदारांना सात दिवसांसाठी निलंबित केले.
संसदेच्या परिसरात राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्यासह काँग्रेसचे तीन, डाव्या पक्षाचे दोन, तृणमूल काँग्रेसचे दोन आणि आम आदमी पक्षाचे एक खासदार रात्रभर अशा आठ खासदारांनी संसद परिसरात ठिय्या मांडला. यात डेरेक ओब्रायन, दोला सेन (तृणमूल), राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन (काँग्रेस), संजय सिंह (आप), के.के. रागेश, इल्लामारम करीम (CPI-M) यांचा समावेश आहे.