नवी दिल्ली, 21 मे : देशभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे 31 मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे अनेकजण आपल्या कुटुंबापासून लांब दुसऱ्या शहरांमध्ये अडकले आहेत. लॉकडाऊनदरम्यान एका 70 वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तीला त्याचं कुटुंब मिळालं आहे. ही घटना 70 वर्षांच्या करम सिंह यांची आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार करम सिंह साधारण 3 वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या लग्नासाठी पैशांची सोय करण्यासाठी उत्तर प्रदेशातील आपल्या गावातून बाहेर गेले होते. त्यांनी चुकून बंगळुरुला जाणारी ट्रेन पकडली आणि कसेबसे ते म्हैसूरला पोहोचले. लांबचा प्रवास, तणावामुळे ते आजारी पडले. आणि तेथेच त्यांना स्मृतीभ्रंश झाला. त्यांना त्यांचं मागील जीवन आठवत नव्हतं. ते म्हैसूरच्या रस्त्यांवरुन भटकत होते. अशावेळी त्यांना कोणीतरी काही खायला देत होतं. त्यावर त्यांचं जीवन सुरू होतं. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर करम सिंह यांना रस्त्यावर फिरत असताना पाहून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यांना काही आठवण नव्हते व कोणीच त्यांना ओळखत नसल्याने करम सिंह यांना नांजाराजा बहादूर नावाच्या वृद्धाश्रमात ठेवले. वृद्धाश्रमात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होता. मनोचिकित्सकांनी त्यांच्यावर उपचार केला. आता हळूहळू त्यांना मागचं आठवत आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबीयांची माहिती वृद्धाश्रमाला दिली. हा पत्ता उत्तर प्रदेशातील होता. त्यानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने म्हैसूर कॉर्पोरेशनशी संपर्क साधला. करम सिंह यांच्या मुलांना वाटत होतं त्यांच्या पित्याचा मृत्यू झाला आहे. जेव्हा त्यांना आपले पिता जिवंत आहेत व त्यांना अधिकारी घरी पाठवत असल्याचे कळताच ते आनंदी झाले. एका स्वयंसेवी संस्थेमार्फत करम सिंह यांना म्हैसूरहून उत्तर प्रदेशात पाठविण्यात येणार आहे.