नवी दिल्ली, 30 मे : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचीही घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊनचा हा टप्पा याआधी करण्यात आलेल्या लॉकडाऊनपेक्षा वेगळा असणार आहे. कारण या टप्प्यात निर्बंध शिथिल करत मोठी सूट देण्यात आली आहे. आंतरराज्य हालचालींवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. तसंच 8 जून नंतर कन्टेमेंट झोनशिवाय इतर भागातील मंदिर, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांचे मोठे हाल होत होते. त्यामुळे लॉकडाऊन उठवण्याची किंवा त्यामध्ये मोठी शिथिलता आणण्याची मागणी सातत्याने समोर येत होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवला असला तरीही त्यामध्ये मोठी सूट दिली आहे. कसा असेल लॉकडाऊन 5 ? स्थानिक उड्डाण आणि मेट्रोच्या आंतरराष्ट्रीय कामकाजाचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल हा लॉ डाऊन टप्पा 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे जुलै महिन्यातील परिस्थितीनुसार शाळा, सिनेमा हॉलचा निर्णय घेण्यात येईल रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत लोकांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे दरम्यान, देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड-19 चा संसर्ग टाऴण्यासाठी आतापर्यंत 4 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत असेल. आतापर्यंत कसा वाढवला गेला लॉकडाऊन? पहिला टप्पा 24 मार्च रोजी 21 दिवसांसाठी होता. त्यानंतर 14 एप्रिल ते 3 मे असा दुसरा टप्पा तर 17 मेपर्यंत तिसरा आणि 31 मेपर्यंत चौथा टप्पा होता. त्यानंतर आता पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. संपादन - अक्षय शितोळे