आगरा, 8 मे : उत्तरप्रदेश राज्यातील प्राथमिक शिक्षण विभागातून (Primary Education Department) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका (Headmaster) शाळेत न येता पगार घेत होती. तसेच शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी एका तरुण मुलीला मुख्याध्यापिकेने महिन्याला पाच हजार रुपयांवर ठेवले होते. ती तरुणी मुख्याध्यापिकेच्या जागेवर विद्यार्थ्यांना शिकवत होती. असा आला उघडकीस प्रकार -
पोषण आहार योजनेचे विभागीय उपनिरीक्षक उर्दू राकेश कुमार आणि विभागीय समन्वयक राकेश कुमार पाराशर हे 6 मे रोजी जैतपूर कलान येथील प्राथमिक शाळा नागला सुरईची तपासणी करण्यासाठी गेले होते. शाळेत तपासणी करताना मुख्याध्यापिका सुमन सिह तिथे मिळाल्या नाहीत. तर त्यावेळी चौकशी केली असता एक तरुणी तिथे उपस्थित होती. हजेरी रजिस्टरमध्ये पाहिले असता 29 एप्रिलपासून कोणतीही सूचना न देता मुख्याध्यापिका सुमन सिंह गैरहजर असल्याचे आढळले. हजेरी रजिस्टरमध्ये 28 एप्रिल रोजी प्रासंगिक रजा आढळून आली.
पत्रव्यवहारात कॅज्युअल रजेची नोंद रजिस्टरमध्ये केलेली नव्हती. जेव्हा तपासणीसाठी आलेल्या टीमने माध्यान्ह भोजन आणि विद्यार्थ्यांचे रजिस्टर मागितले असता सर्व मुख्याध्यापकांकडे असल्याचे शिक्षक व शिक्षिकांनी सांगितले. यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले.
यानंतर याप्रकरणी विभागीय सहाय्यक शिक्षण संचालक महेश चंद्र यांनी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना मुख्याध्यापक व संबंधित दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर समिती स्थापन करून चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे ते म्हणाले.
चौकशीत सहाय्यक शिक्षक मनीष कुमार, शिक्षामित्र अंजू, उषा यांनी टीमला सांगितले की, मुख्याध्यापिका सुमन सिंग यांच्याऐवजी एक तरुणी शिकवत होती. या तरुणीने सांगितले की, ती ऑक्टोबर 2021 पासून शाळेत शिकवत आहे आणि मुख्याध्यापिकेकडून तिला दरमहा 5000 रुपये दिले जातात. तर यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही मुख्याध्यापिकेला पाहिले नसल्याचे सांगितले.
हेही वाचा - आंतरजातीय विवाहानंतर घरच्यांनी फरफटत माहेरी नेलं; पतीच्या हाकेनंतर मदतीसाठी धावून आले पोलीस
माध्यान्ह भोजनातही घोटाळा -
मूलभूत शिक्षण विभागाच्या पथकाने जैतपूर कलान येथील बडा गावातील प्राथमिक शाळेतील माध्यान्ह भोजनाचा घोटाळा समोर आणला आहे. येथे नोंदणी केलेल्या 45 ऐवजी 22 विद्यार्थी उपस्थित होते. तर माध्यान्ह भोजन रजिस्टरमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 45 लिहिली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच विभागीय सहाय्यक शिक्षण संचालक यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आणि समिती स्थापन करून प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच माध्यान्ह भोजनासाठी जारी केलेली रक्कम परत करण्यास सांगितले आहे.