राजकोट 09 ऑक्टोंबर : सरकारी काम आणि महिनाभर थांब अशी एक म्हण आहे. कुठलंही सरकारी काम वेळेवर होत नाही अशी ख्यातीच असल्याने सामान्य माणूस साध्यासाध्या कामांसाठी मेटाकुटीला येत असतो. त्यामुळे कुठलंही काम योग्य पद्धतीने होत नसेल तर त्याला ‘सरकारी’ पद्धतीचं काम असं म्हटलं जातं. या सरकारी सिस्टीमचा फटका खुद्द गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या भावाला बसलाय. वेळेवर अॅम्बुलन्स पोहोचू शकली नसल्याने उपचारा अभावी मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाचा मृत्यू झाल्याची घटना गुजरातमध्ये घडलीय. त्यामुळे अॅम्बुलन्स सेवेच्या सरकारी दाव्यातली हवाही निघाली आहे. ‘108 नंबर’वर फोन केला की तत्काळ अॅम्बुलन्स उपलब्ध करून देण्याची योजना देशातल्या अनेक राज्यांमध्ये राबवली जाते.
सामान्य नागरिकांसाठी ही अतिशय महत्त्वाची सुविधा असून त्याचा गरजूंना लाभ होत असल्याचा दावा गुजरात सरकार कायम करत असते. मात्र आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच भावाला याचा फटका बसल्याने सरकारच्या दाव्यांमधली हवाच निघाली आहे. राजकोट इथं अनिल संघवी हे मुख्यमंत्री विजय रुपणी यांचे मावस भाऊ राहतात. सौराष्ट्र कला केंद्र इश्वरिया इथं त्यांचं निवासस्थान आहे. 4 ऑक्टोबरला त्यांना श्वास घ्यायला त्रास जात होता. त्यामुळे त्यांचा मुलगा गौरांग याने 108 नंबरला फोन करून अॅम्बुलन्स बोलावण्याचा निर्णय घेतला. मात्र वारंवार फोन करूनही अॅम्बुलन्स काही वेळेत आली नाही.
अॅम्बुलन्स यायला 45 मिनिटं उशीर झाला. तोपर्यंत अनिल संघवी यांचा त्रास वाढतच होता. अॅम्बुलन्स आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पेशंटला लवकर आणलं असतं तर संघवींना कदाचित वाचवलं गेलं असतं असं डॉक्टरांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांच्याच नातेवाईकाला हा अनुभव आल्यानं प्रशासनही हादरून गेलं असून मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.