हैदराबाद 21 ऑगस्ट: श्रीशैलम इथे असलेल्या पॉवर स्टेशनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी तीन जणांचा शोध लागलेला नाही. बचाव कार्यात सहभागी असलेल्या पथकाने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. शुक्रवारी पहाटे ही भीषण आग लागली होती. त्यानंतर 10 लोकांना बाहेर काढण्यात आलं होतं. त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय. तर 4 जणांवर उपचार सुरु आहेत. श्रीशैलम इथं पवनचक्की असून धरणाच्या पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते. पॉवर स्टेशनमधल्या एका भागात ही आग लागली आणि वेगाच्या वाऱ्यामुळे झपाट्याने आग सगळीकडे पसरली. ही आग एवढ्या वेगात पसरली की पॉवर स्टेशनच्या मोठ्या भागाचा त्याने ताबा घेतला. प्रचंड धुरामुळे लोकांना बाहेरही पडता आलं नाही. प्रचंड आग आणि धुरांच्या लोटांमुळे लोकांचा गुदमरल्याने मृत्यू झाला.
घटनेनंतर फायर ब्रिगेडच्या पथकाने बचाव कार्याला सुरुवात केली. मात्र आगीची भीषणता एवढी होती की त्याने प्रचंड नुकसान केलं. काही तासांच्या प्रयत्नानंतर त्यावर ताबा मिळवण्यात बचाव पथकाला यश आलं. आतमध्ये अडकलेल्यांचा शोध घेण्यात येत असून पॉवर स्टेशनचं काही काम थांबविण्यात आलं आहे.