नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : दिल्लीतील आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहीर हुसैन यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयबीतील कॉन्स्टेबल अंकित शर्मा यांची दिल्ली हिंसाचारात हत्या करून त्यांचा मृतदेह एका नाल्यात टाकण्यात आला. या हत्येप्रकरणी ताहीर हुसैन आरोपी आहेत. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारात दंगेखोरांनी आयबी कॉन्स्टेबलचा खून करून मृतदेह नाल्यात फेकल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली. आयबी कॉन्स्टेबलचा मृतदेह चांद बाग पुलावरील नाल्यातून काढण्यात आला. मृत अंकित शर्मा खजुरी इथे राहत होते. मंगळवारी संध्याकाळी ते ड्युटीवरून घरी परतत होते. चांद बाग पुलावर काही लोकांनी त्यांना घेरलं असा आरोप केला जात आहे. त्यांना मारहाण केली गेली आणि नंतर हत्या करून मृतदेह नाल्यात टाकण्यात आला.
मंगळवारपासून शर्मा यांचे कुटुंबीय त्यांच्या शोधात होते. अंकित यांचे वडील रविंदर शर्मा हेही आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, अंकितलाही मारहाण करून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. रविंदर शर्मा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अंकित हे 2017 मध्ये आयबीमध्ये भरती झाले होते. त्यांचा अद्याप विवाहदेखील झाला नव्हता. त्यांच्या हत्येनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आप नगरसेवकाच्या घरात सापडले पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा खच ताहिर हुसैन यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब, बंदुका, मोठ मोठे दगड, बॅचकी जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या घराचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये या घरातून सतत दगडफेक व पेट्रोल बॉम्ब येत होते. गुप्तचर विभागाचे सहकारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी या घराच्या छतावर असलेल्या लोकांना शर्मा यांच्या कुटुंबीयांनी जबाबदार ठरविले आहे. आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.