नवी दिल्ली, 31 जानेवारी : दिल्लीत लाल किल्ल्यावर 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराबाबत रविवारी ‘मन की बात’मध्ये बोलताना मोदींनी, तिरंग्याच्या अपमानाने संपूर्ण देश दु:खी झाल्याचं म्हटलं. पंतप्रधान मोदींच्या या प्रतिक्रियेनंतर शेतकरी नेते आणि कृषि कायद्यांविरोधात आंदोलन करणारे राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिरंगा केवळ पंतप्रधानांचा आहे का? असा सवाल करत त्यांनी, संपूर्ण देशाचं आपल्या तिरंग्यावर प्रेम आहे. ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडलं जावं अशी मागणी केली आहे. ज्याने कोणी तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घ्या, अशी प्रतिक्रिया टिकैत यांनी दिली आहे.
रविवारी 73व्या ‘मन की बात’मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. लाल किल्ल्यावर झालेला तिरंग्याच्या अपमानाने संपूर्ण देश दु:खी असल्याचं मोदी म्हणाले. 26 जानेवारी प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवेळी काही लोकांनी लाल किल्ल्यावर ज्याठिकाणी पंतप्रधान दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला झेंडा फडकवतात त्याठिकाणी, निशान साहिब यांचा झेंडा फडकवला होता.
दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांहून अधिक काळ शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर 26 जानेवारी रोजी आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं.