नवी दिल्ली 29 ऑक्टोंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मदतीसाठी सरकारने उप राष्ट्रीय सल्लागारांची नियुक्ती केलीय. अजित डोवाल यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना ‘जेम्स बॉण्ड’ असं म्हटलं जातं. डोवाल यांच्या मदतीसाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आलीय. ते देशाचे नवे राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागार असतील. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षा हा विभाग देण्यात आलाय. पडसलगीकर यांनी IBमध्ये संचालक म्हणून काम केलंय. अतिशय कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून पडसलगीकर यांची ख्याती आहे. ते आता अजित डोवाल यांना मदत करतील. दिल्लीतल प्रतिनियुक्तीवर असतानाच राज्य सरकारच्या विनंतीवरून त्यांची खास मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भाजप आक्रमक, मुख्यमंत्री नाही तर शिवसेनेसोबत फक्त उपमुख्यमंत्रिपदावर चर्चा मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास कामात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर या हल्ल्याचे धागेदोरे त्यांनी शोधून काढले होते. त्यांनीच केलेल्या प्रयत्नांमुळे अतिरेकी आणि त्यांच्या म्होरख्यांमध्ये झालेलं महत्त्वाचं संभाषणही आपल्या सुरक्षा यंत्रणांना मिळालं होतं. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्येही त्यांनी सुरवातीच्या काळात काम केलं होतं. मुंबईतल्या काही टोळ्यांचं कंबरडही त्यांनी मोडलं होतं. अतिशय मितभाषी पण कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.
कोण आहेत दत्ता पडसलगीकर? -1982च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी - प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून ख्याती - IBमध्ये संचालक म्हणून दीर्घकाळ कामाचा अनुभव - अमेरिकेसह त्यांनी अनेक देशांमध्ये काम केलंय - राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नेटवर्किंग - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक म्हणून काम