नवी दिल्ली 12 एप्रिल : सर्व देशात कोरोनाचा कहर सुरू असताना राजधानी दिल्लीत सायंकाळी आज भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि परिसरात हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.5 एवढी होती. दिल्ली सह उत्तर भारतातल्या अनेक शहरांना हे धक्के जाणवले. मात्र कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचं वृत्त नाही. सायंकाळी 5.50 मिनिटांनी हे धक्के जाणवले. लॉकडाऊनमुळे सगळे लोक घरात होते. भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेक लोक घरांमधून बाहेर आले. सर्व लोक सुरक्षीत असतील. घाबरण्याचं कारण नाही असं ट्वीट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं. तर कोरोना सुरू आहे. तो कमी म्हणून की काय आता भूकंप आला. देवा तुझ्या मनात आहे तरी काय असं ट्वीट उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केलं.
गेल्या 24 तासांमध्ये देशात 918 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 31 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 8447 वर गेली आहे. 29 मार्चला ही संख्या फक्त 979 एवढी होती. यातल्या 20 टक्के रुग्णांना ICUमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यात 1671 रुग्णांना ऑक्सिजन द्यावा लागत असून त्यातल्या अनेकांची प्रकृती क्रिटिकल असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. सध्या आपल्याला 1,671 एवढ्या बेड्सची गरज असताना आपल्याकडे 1 लाख 5 हजार बेड्स तयार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सोशल डिस्टन्सिंगशिवाय कोरोनावर दुसरा उपाय नाही असंही ते म्हणाले.