मुंबई, 06 फेब्रुवारी: मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचे आणि त्याच्या क्रिकेटमधील दमदार इनिंगचे चाहते जगभरात आहेत. मात्र सध्या क्रिकेटसाठी नाही तर एका वेगळ्या कारणासाठी सचिन चर्चेत आहे. देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) निमित्तानं सचिनचं नाव चर्चेत आलं आहे. दरम्यान सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विरोधात देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. केरळमधून सचिनविरोधात आंदोलन करण्यासाठी युवा काँग्रेस रस्त्यावर देखील उतरली आहे. केरळमध्ये कोची याठिकाणी युवा कॉग्रेसने सचिनच्या कट-आउटवर काळं तेल ओतून सचिनचा निषेध व्यक्त करण्यात आला. शेतकरी कायद्यासंदर्भात सचिनने ट्वीट केलं होतं त्यानंतर या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान सचिनविरोधात झालेल्या या प्रकारानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीला सवाल करणारं एक ट्वीट केलं आहे. त्यांनी असं ट्वीट केलं आहे की, ‘केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचे अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?’ यावेळी त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेचं ट्वीट रीट्वीट केलं आहे, ज्यामध्ये केरळ युवा काँग्रेसने केलेल्या सचिनच्या विरोधाचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
एवढंच नव्हे तर नेटकऱ्यांनी देखील सचिनला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. केरळमधील काही सोशल मीडिया युजर्सनी तर थेट टेनिसस्टार मारिया शारापोव्हाची याप्रकरणी माफी मागितली आहे. सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखू शकलो नाही. आम्हाला माफ कर. तू बरोबर होतीस.’ अशा आशयाचे मेसेज त्यांनी मारियाला पाठवले आहेत. मारियानं 2014 साली झालेल्या विम्बलडन स्पर्धेच्या दरम्यान आपण भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) ओळखत नाही, असं वक्तव्य केलं होतं. सचिनवर राग का? शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं अनेक विदेशी सेलिब्रेटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्याची मोहीम भारतामध्ये सुरु झाली होती. याच मोहिमेअंतर्गत सचिननं बुधवारी ट्वीट केलं होतं. ‘देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या’,
सचिननं हे ट्वीट करताच भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी या विषयावर ट्वीट करत विदेशी मंडळींना सुनावलं आहे. त्याचवेळी सचिनच्या ट्विटमुळे काही जण दुखावले देखील आहेत. याच दुखावलेल्या मंडळीनी शारापोव्हाला संदेश पाठवून माफी मागितली आहे.