नवी दिल्ली, 15 मार्च : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) अद्यापही उपचार मिळालेला नाही. मात्र अखिल भारत हिंदू महासभेनं गोमूत्र पिऊन कोरोनाव्हायरसपासून वाचता येऊ शकतं, असा दावा केला आणि गोमूत्र पार्टीचं आयोजनही केलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री रिचा चड्ढाही (Richa Chadha) हैराण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या गोमूत्र पार्टीचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर अभिनेत्री रिचा चड्ढाने त्यावर प्रतिक्रिया दिली होती. या गोमूत्र पार्टीला कोण जातं, कोण गोमूत्र पितं आणि कोण त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग करतं, हे मला पाहायचं आहे, असं तिनं म्हटलं होतं.
त्यानंतर रिचा चड्ढाला या गोमूत्र पार्टीचा व्हिडीओ टॅग करण्यात आला आहे. ज्यामध्ये लोकं गोमूत्र पिताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ पाहून रिचा चड्ढाच नव्हे, तर सर्वांनाच शॉक बसेल. कारण कोरोनाव्हायरस या महाभयंकर विषाणूने जगभरात हजारो लोकांचा जीव घेतला आहे तर लाखो लोकांना याची लागण झाली आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 107 रुग्ण आहेत. 10 रुग्ण बरे झालेत, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात कोरोनाव्हायरसचे ३२ रुग्ण आहे. पुणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद, नवी मुंबई, पनवेलमध्ये हे रुग्ण आढळून आलेत. हे वाचा - दारूची पार्टी पडली महागात, 11 मित्रांना झाला ‘कोरोना’