तिरुवनंतपुरम 17 मार्च : भारतात कोरोनाग्रस्त (coronavirus) रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच (doctor) कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गीमध्ये ज्या कोरोनाव्हायरस रुग्णाचा मृत्यू झाला, त्याच्यावर हा डॉक्टर उपचार करत होता. हा डॉक्टरही आता कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह आहे.
या डॉक्टरला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर त्याच्या कुटुंबाला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. कर्नाटकात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या दहावर पोहोचली आहे.
दरम्यान केरळमध्येही तब्बल 26 डॉक्टरांचा जीव धोक्यात आहे. श्रीचित्रा इन्स्टिट्युटमधील हे डॉक्टर आहेत. स्पेनहून परतलेल्या एका डॉक्टरला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. हा डॉक्टर इन्स्टिट्युटमधील डॉक्टरांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे आता या डॉक्टरांचंही आरोग्य धोक्यात आहे.